Mumbai News : जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचं –  राज ठाकरे

एमपीसी न्यूज – छोट्या उद्योगांनी त्यांचं उत्पादन चालू ठेवा पण त्याची विक्री होऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे, पण मुळात जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचं? त्यामुळे आठवड्यात किमान 2 ते 3 दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी, अशी विनंती राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झूम मीटिंगद्वारे कोरोना परिस्थितीवर चर्चा केली त्या चर्चेचा तपशील यावेळी पत्रकार परिषदेत सांगितला.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत असं चित्र आहे पण ह्याला काही कारणं आहेत. महाराष्ट्र हे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेलं राज्य आहे त्यामुळे बाहेरील राज्यातून मोठ्या संख्यने लोकं येतात आणि ते जिथून येतात त्या राज्यांमध्ये कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी आहे.

तसेच मागच्या लॉकडाऊनच्या वेळी जेव्हा परप्रांतीय कामगार निघून गेले तेव्हा मी सरकारला सूचना केली होती की हे सगळे परत येतील तेव्हा त्यांची मोजणी करा आणि कोरोना चाचण्या करा पण हे काही झालं नाही.

लॉकडाऊनच्या काळात वीजबिलं माफी द्यायला हवी कारण मुळात उत्पादन सुरु नाही, ऑफिस बंद आहेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा परिस्थितीत लोकांनी भरमसाठ वीजबिलं कशी भरायची? असा सवालही त्यांनी या चर्चे दरम्यान उपस्थित केला.

बँकाकडून थकीत कर्जाच्या बाबतीत कर्जदारांकडे जो तगादा सुरु आहे त्यामुळे कर्जदार त्रस्त आहेत कारण मुळात उद्योग बंद आहेत, नोकऱ्या गेल्या आहेत अशा वेळेस जो तगादा सुरु आहे तो थांबायला हवा. ह्या सक्तीच्या वसुलीसंदर्भात बँकांशी सरकारने चर्चा करायला हवी.

तसेच शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करा, १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना ह्यावर्षी उत्तीर्ण केलं पाहीजे. सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा.

अनेक खासगी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत.

कंत्राटी कामगारांना काढायचं पुन्हा कोरोना वाढला कि घ्यायचं ह्यापेक्षा सरकारने महापालिकांमध्ये कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यायला हवं. अशा काही मागण्याही त्यांनी यावेळी मांडल्या.

हॉस्पिटल्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी, आम्ही हॉस्पिटल्सना जबाबदारीची जाणीव करून देऊ शकतो पण आमची जाणीव करून देण्याची पद्धत वेगळी आहे पण ही ती वेळ नाही.

मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा आहे. अनिल देशमुख हा मुद्दा महत्वाचा नाही. माझी माध्यमांना विनंती आहे की मूळ मुद्दा भरकटू देऊ नका. असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

परमबीर सिंग ह्यांना १०० कोटींच्या टार्गेटची आठवण त्यांना पोलीस आयुक्त पदावरून हटवलं गेल्यावरच का झाली? आधी का नाही झाली? आणि बार आणि रेस्टोरंटकडून १०० कोटींचं टार्गेट अनिल देशमुखांकडून दिलं गेलं हा आरोप होणंच लांच्छनास्पद आहे.

मला काल एकाने विनोद सांगितला, ‘सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?’

माझे पक्षातील सहकारी जमील शेख ह्यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचा पदाधिकारी नजीम मुल्ला ह्याचं नाव आलं आहे. ह्याच पदाधिकाऱ्यांचं नाव सुरज परमार हत्या प्रकरणातही आलं होतं. ह्याप्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालावं.

राष्ट्रवादीच्या नजीम मुल्लाचं नाव आल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ह्यांनीही ह्या प्रकरणाची दखल घ्यावी. असे राजरोसपणे खून पडायला लागले तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. ह्यासंबंधी मी पवारसाहेबांची भेट घेणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.