Wakad News : स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालवणा-यास अटक; तीन महिलांची सुटका
एमपीसी न्यूज – स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 29) दुपारी भुमकर चौक, वाकड येथील क्रॉसरोड मॉल येथे करण्यात आली.
रोहिदास बाबाजी आढाव (वय 21, रा. पवारनगर काळेवाडी. मूळगाव सांगवी सूर्या ता. पारनेर जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे. याबाबत एका महिलेने बुधवारी (दि. 29) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आढाव हा तीन महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होता. त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवत होता. याबाबत माहिती मिळताच भुमकर चौक, वाकड येथील क्रॉसरोड मॉल येथे बुधवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी यावेळी तीन महिलांची सुटका केली. तसेच 11 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.