Pune ACB News: जात पडताळणीसाठी 8 लाख मागितले, उपायुक्त दर्जाचा अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

एमपीसी न्यूज – पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यरात्री पुण्यात मोठी कारवाई करत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपआयुक्त नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

नितीन चंद्रकांत ढगे (वय 40) असे पकडण्यात आलेल्या उपआयुक्त यांचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन ढगे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपआयुक्त आहेत. तसेच ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य देखील आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी त्यांनी जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक नितीन ढगे यांनी त्यांच्याकडे 8 लाख रुपयांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात 3 लाख रुपयांची लाच मागण्यात आली. त्यानुसार मध्यरात्री सापळा कारवाईत तडजोडीअंती 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. राहत्या घराजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.