Pune News : देशभक्त तरुणांच्या मुखामुखात रेंगाळणार ‘गाणे स्वातंत्र्याचे’! – विनायक लिमये

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाच्या (26 जानेवारी) संध्याकाळी सादर होणाऱ्या ‘गाणे स्वातंत्र्याचे’ या देशभक्तीपर मराठी-हिंदी गाण्यांचा सदाबहार कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. या कार्यक्रमानंतरही देशभक्त तरुणांच्या मुखामुखात ‘गाणे स्वातंत्र्याचे’ नक्कीच रेंगाळत राहील, असा विश्वास नामवंत संगीतकार-गायक तसेच नादब्रह्म संगीतालयाचे संचालक विनायक लिमये यांनी व्यक्त केला.

एमपीसी न्यूज व आवाज न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तळेगाव दाभाडे येथील इमराल्ड रिसोर्टच्या विशेष सहकार्याने या संगीत मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज व आवाज न्यूज चॅनलच्या फेसबुक पेजवर 26 जानेवारीला संध्याकाळी सहा वाजल्यापासून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (फेसबुक लाईव्ह) केले जाणार आहे. तळेगाव दाभाडे येथील नादब्रह्म संगीतालयाचे कलाकार हा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत.‌ नादब्रह्म संगीतालयाचे गायक-वादक कलाकार सध्या या कार्यक्रमाच्या तालमी अविश्रांत मेहनत घेत आहेत.

कार्यक्रमाविषयी बोलताना लिमये म्हणाले की, 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. यावर्षी आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असल्यामुळे आम्ही थोडी वेगळ्या धर्तीची गाणी निवडली आहेत. या गाण्यांमधील शब्दांना जास्त महत्त्व आहे, शिवाय गाण्याच्या सुरांमुळे प्रेक्षक नक्कीच मंत्रमुग्ध होतील हा विश्वास आहे. कार्यक्रमानंतर देखील ही गाणी देशभक्त नागरिकांच्या विशेषतः तरुणांच्या मुखात दीर्घकाळ रेंगाळत राहतील.

समर्पण म्हणजे काय हे आपल्याला क्रांतिकारकांच्या बलिदानातून कळते. त्यांच्या बलिदानाचे स्मरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने केले जाणार आहे. तरी सर्व देशभक्त नागरिकांनी ‘गाणे स्वातंत्र्याचे’ या कार्यक्रमाचा जरूर आस्वाद घ्यावा, असे आवाहन लिमये यांनी केले.

कार्यक्रमातील मुख्य गायिका संपदा थिटे म्हणाल्या की, ‘गाणे स्वातंत्र्याचे’ हा कार्यक्रम सादर करण्यास आम्ही सर्वच कलाकार अतिशय उत्सुक आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रजासत्ताक दिनी हा कार्यक्रम होत असल्याने कलाकारांच्या दृष्टीनेही त्याला एक विशेष महत्त्व आहे. परिणामकारक शब्द – प्रभावी स्वर रचना असलेल्या काही निवडक, वैविध्यपूर्ण देशभक्तीपर गीते हया कार्यक्रमामधून सादर होणार आहेत.’

या ऑनलाईन सोहळ्यात सहभागी होऊन सर्व देशप्रेमी बंधू-भगिनींनी संगीत मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘इमराल्ड रिसोर्ट’चे व्यवस्थापकीय संचालक किशोर आवारे यांनी केले आहे.

तळेगाव दाभाडे येथील नादब्रह्म संगीतालयाचे प्रतिथयश कलाकार संपदा थिटे, विनायक लिमये, अंकुर शुक्ल, विराज सवाई, डॉ. सावनी परगी, प्रणव केसकर, कीर्ती घाणेकर, निधी पारेख, धनश्री शिंदे आणि चांदणी पांडे यांचा कलाविष्कार यावेळी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. मंगेश राजहंस, प्रवीण ढवळे व अमोल पांढरे हे वादक कलाकार त्यांना साथसंगत करणार आहेत. नामवंत निवेदिका डॉ. विनया केसकर त्यांच्या खास शैलीत कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.