Cricket and America : क्रिकेट आणि अमेरिका
एमपीसी न्यूज : युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका – जगातील (Cricket and America) एक बलाढ्य देश. अमेरिकेला एक मोठा इतिहास आहे. कला, क्रीडा, संस्कृती या सर्वच बाबतीत अमेरिका कायमच स्वतःचे एक वेगळे स्थान टिकवून आहे. अमेरिकेची क्रीडा संस्कृती हा एक चांगल्या चर्चेचा विषय होऊ शकतो; ऑलिम्पिक खेळांमध्ये कायमच अमेरिका आघाडीवर असते. ऍथलेटिक्स, जलतरण, टेनिस आदी खेळांमध्ये कायमच अमेरिकन खेळाडू जागतिक पातळीवर चमकत आले आहेत. पण एवढ्या मोठ्या देशामध्ये क्रिकेटचे स्थान काय आहे असा प्रश्न आपल्याला कायमच पडत आला आहे.
एक प्रवाद असाही आहे की अमेरिकेला क्रिकेटमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. त्यांचा आणि क्रिकेटचा काहीही संबंध नाही. अमेरिका आणि बेसबॉल हे नातं जास्त घट्ट असल्याने तिथे क्रिकेटचं वातावरण तयार होऊच शकत नाही. हे काही अंशी खरं असलं तरी संपूर्ण सत्य नक्कीच नाही. अमेरिकेत चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं जातं, अमेरिकेचा क्रिकेटचा राष्ट्रीय संघ आहे, आणि आयसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये अमेरिका भाग घेत असते. एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेट अश्या दोन्ही प्रकारात अमेरिकेचा राष्ट्रीय संघ भाग घेत असतो. एवढेच नाही, तर 2004 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अमेरिकेचा संघ सहभागी झाला होता. त्या स्पर्धेत त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ह्या देशांविरुद्ध सामने खेळले. (ह्या दोन्ही सामन्यात त्यांचा दारुण पराभव झाला हे सांगायला नको.)