Pune News : कालीचरण यांची अटक योग्य असेल, तर राहुल गांधी यांनाही अटक करावी लागेल – अधिवक्ता गौरव गोयल

एमपीसी न्यूज – ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या कालीचरण महाराजांना केलेली अटक योग्य असेल तर, राहुल गांधी यांनीही हिंदु धर्माविषयी चुकीची विधाने केली आहेत. त्यांनाही अटक करावी लागेल,’ असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता गौरव गोयल यांनी केले.

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु देवी-देवतांचा अपमान अभिव्यक्ती; तर गांधीजींवर बोलणे अपराध का ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. यावेळी बोलतांना इतिहासाचे अभ्यासक सतीश देशपांडे म्हणाले की, राष्ट्रापेक्षा मोठा कोणी असू शकत नाही. संविधानाच्या कोणत्याही कलमात अमुक एखाद्या व्यक्तीला ‘राष्ट्रपिता’ संबोधावे, असे म्हटलेले नाही तसेच कोणी व्यक्ती म्हणून ‘राष्ट्रपिता’ असावी, अशीही आपल्याकडे व्यवस्था नाही.

गांधीजी त्यांच्या विवादास्पद जीवनकाळात मुळातच ‘अलोकप्रिय’ होते. त्यामुळे आतापेक्षा त्यांच्या जीवनकाळात त्यांना अधिक टीकेचा सामना करावा लागला होता. गांधीजींवर टीका-टीप्पणी करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. न्यायालयाने तशी सूट दिली आहे. गांधींच्या कार्याचे मूल्यमापन व्हायला हवे.

राष्ट्रीय वारकरी परिषदे’चे प्रवक्ते ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे म्हणाले की, आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेक राष्ट्रपुरुषांचा अपमान या देशात केला गेला; मात्र केवळ गांधींवर टीका केली की त्याला अपराध मानले जाते. थोडक्यात या देशात राष्ट्रप्रेमी नागरिक, साधू-संत यांसाठी एक कायदा आणि राजकीय नेत्यांसाठी वेगळा कायदा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.