Pimpri : सल्लागारांनो! कार्यालयात बसून ‘डिझाईन’ करु नका, अन्यथा काळ्या यादीत टाकू

स्थायी समितीचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सल्लागारांनी कार्यालयात बसून विकास कामांचे डिझाईन करु नये. स्थळ पाहणी करून डिझाईन तयार करावे. स्थळ पाहणी करताना महापालिकेच्या कनिष्ठ, उपअभियंत्यांना सोबत घ्यावे. छायाचित्रे, व्हिडीओ शुटिंग काढण्यात यावे अशा सूचना स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच यापुढे ‘साईट व्हिजीट’ न करणा-या सल्लागारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

आचारसंहिता संपल्यानंतर स्थायी समितीची पहिली सभा आज (बुधवारी) पार पडली. सभापती विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 16, 30 ऑक्टोबर आणि आजची 6 नोव्हेंबर अशा तीन सभा झाल्या. एकूण 8 कोटी 81 हजार रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली.

पिंपरी महापालिकेत सल्लागारांचा सुळसुळाट सुरु आहे. सल्लागारांना अच्छे दिन आले आहेत. मागील तीन वर्षांपासून सल्लागारांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती केली आहे. उड्डाणपूल बांधण्यापासून ते पदपथ तयार करण्याच्या छोट्या-मोठ्या कामासांठी देखील सल्लागारांची नेमणूक केली जात आहे.

30 ऑक्टोबरमधील सभेच्या विषयपत्रिकेवर स्थळ पाहणी स्थळपाहणी न करताच अंदाजपत्रक केलेले सल्लागार मेसर्स आकार अभिनव यांना पॅनेलवरुन काढण्याचा विषय होता. या विषयाला मान्यता देत  हलगर्जीपणाचा ठपका ठेवत मेसर्स आकार अभिनव यांना पॅनेलवरुन काढण्यात आले आहे.

स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सल्लागारांनी कार्यालयात बसून विकास कामांचे डिझाईन करु नये. दहा ठिकाणी साईट व्हिजीट असल्यास महापालिकेच्या कनिष्ठ, उपअभियंत्यांना सोबत घ्यावे. छायाचित्रे, व्हिडिओ शुटिंग काढण्यात यावे. यापुढे ‘साईट व्हिजिट’ न करणा-या सल्लागारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.