IND vs SA : अफ्रिका संघाने तिसरा आणि अंतिम सामन्यात रोमांचक विजय मिळवून भारताला दिला व्हाईटवॉश

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : धवन, कोहलीचे अर्धंशतक आणि त्यानंतर दीपक चाहरने केलेल्या प्रयत्नांना भारतीय संघातले इतर फलंदाज न्याय देऊ शकले नाहीत आणि केवळ चार धावांनी का होईना पण दक्षिण आफ्रिका संघाने तिसऱ्या आणि अंतीम सामन्यात भारतीय संघाला पराभूत करून तीन शून्य अशी मालिका जिंकून भारतीय संघाला कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही पराभूत करून आपला वरचष्मा गाजवला आणि भारतीय संघाचा मानहानीकारक पराभवही केला.

तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात तरी भारतीय संघ  विजय मिळवून किमान आपले शेपूट तरी शाबूत राखेल अशी अपेक्षा करणाऱ्या भारतीय समर्थकांना अखेर निराशा आणि निराशाच मिळाली. तर कर्णधारपदाचा दावेदार म्हणवल्या जाणाऱ्या लोकेश राहुलला ती जबाबदारी किती कठीण असते हे या लाजिरवाण्या पराभवाने नक्कीच कळाले असेल.

लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना या सामन्यात चार बदल केले तरीही त्याने ऋतुराज गायकवाडला मात्र अंतीम संघात स्थान दिले नाही. अश्विन, भुवनेश्वर, ठाकूर आणि वेंकटेश अय्यर ऐवजी सुर्यकुमार, जयंत यादव,दीपक चाहर आणि प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान मिळाले.

दक्षिण अफ्रिका संघाने या संधीचे सोने करत डीकॉकच्या सतराव्या शतकाच्या जोरावर आपल्या निर्धारित पन्नास षटकात 287 धावा चोपून काढल्या.वयाची 30 शी सुद्धा पूर्ण झालेली नसतानाही कसोटी क्रिकेटमधून खळबळजनक निवृत्ती घोषित करणाऱ्या डीकॉकच्या मनात काय होते हे समजण्याआधीच त्याने भारतीय तोफखान्यावर जबरदस्त आक्रमन करत तुफानी खेळी केली.

त्याने केवळ 130 चेंडूत 124 धावा करताना 12 चौकार आणि दोन षटकार मारले. त्याला या मालिकेत सूर गवसलेल्या वँनडरसेनने आणखी एक अर्धशतकी खेळी करत  चांगली साथ दिली. या जोडीच्या कामगिरीवर कळस चढवला तो डेविड मिलरने त्याने जलदगतीने फलंदाजी करत 39 धावा काढल्या यामुळे आफ्रिकेने 287 धावाची मोठी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. भारतीय संघाकडून प्रसिद्ध कृष्णाने तीन तर बुमराह आणि दिपक चाहरने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

288 च्या विजयी आणि आपल्या प्रतिष्ठेला जपण्यासाठी खेळणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार राहुल केवळ नऊ धावा करून इनगीडीच्या गोलंदाजीवर बाद झाला, पण कोहली आणि धवनने या धक्क्यातून सावरत दुसऱ्या गड्यासाठी 98 धावांची भागीदारी केली.

धवनने यादरम्यान आपले या मालिकेतले दुसरे आणि करियरमधले 35 वे अर्धशतक पूर्ण करुन भारतीय संघाला आश्वासक सुरुवात करून दिली.पण संघाची धावसंख्या 116 असताना तो वैयक्तिक 61 धावा काढून फेलुकवालीयोच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ ऋषभ पंत भोपळा सुद्धा न फोडता बाद झाल्याने भारतीय संघाला खूप मोठा धक्का बसला.

विराट कोहली आजही नैसर्गिक खेळाला मुरुड घालून खेळत होता, त्याने 84 चेंडुत केवळ पाच चौकार मारत आपले 64वे अर्धशतक केले,पण केशव महाराजने एका वाईड चेंडुवर त्याला फसवले आणि तो कव्हरला कर्णधार बाऊमाच्या हाती झेल देवून बाद झाला आणि पुन्हा एकदा त्याला आणि त्याच्या अगणित चाहत्यांना शतकी खेळी फसवून गेली.यानंतर विजय आणि भारतीय संघामधील अंतर कमीकमीच होत गेले.

श्रेयस अय्यर ,पुन्हा एकदा संधी मिळालेल्या सुर्यकुमार, यांनाही फार मोठी खेळी करणे जमले आणि आता विजय अगदीच दुरापास्त झालाय असे वाटत असतानाच दीपक चाहरने कमालीची फलंदाजी करत एकतर्फी होत चाललेल्या सामन्यात कमालीची रंगत निर्माण केली. त्याने काही देखणे, काही साहसी तर काही अतिशय उत्तम फटके मारत आपले दुसरे अर्धंशतक पूर्ण केले.

बघताबघता भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ आलाय असे वाटत असतानाच तो 48 व्या षटकात वैयक्तिक 54 धावांवर(34 चेंडू पाच चौकार आणि दोन षटकार)बाद झाला पण त्याने रचलेल्या पायावर उर्वरित फलंदाजांना कळस चढवता आला नाही आणि अगदी तोंडाजवळ आलेला घास दक्षिण आफ्रिका संघाने हिरावून नेला.

बुमराहचे प्रयत्न चार धावानी कमी पडले आणि भारतीय संघाला तीन विरुद्ध शून्य धावांनी मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला.अफ्रिका संघाकडून इंगीडी आणि  फेलुकवालीयोने तीन तीन गडी बाद करत चांगली कामगिरी केली आणि या मालिकेला सुरुवात होण्याआधी विजयाची सर्वाधिक पसंती देण्यात आलेल्या भारतीय संघाला दोनही फॉरमॅट मध्ये लाजिरवाना पराभव स्विकारावा  लागला.

जीत हार हा खेळाचाच एक भाग असला तरी अशा पध्दतीने हारने कुठल्याही रसिकांना आवडणारे नाही,त्यातच भारतीय क्रिकेट रसिकांसारख्या कट्टर क्रिकेटप्रेमीला तर नाहीच नाही त्यामुळेच आता या कटू पराभवाला विसरून भारतीय संघाला यापुढे जबरदस्त कामगिरी करावी लागेल,तेच त्यांचे प्रायश्चित्त असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.