Alandi : कार्तिक यात्रेसाठी अलंकापुरीत येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी हजारो पोलिसांचा बंदोबस्त

भाविकांच्या सुरक्षा, स्वच्छता, आरोग्यासाठी प्रशासन सज्ज

एमपीसी न्यूज – श्री संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन (Alandi) समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. स्थानिक पोलिसांसह बाहेरून मागवलेला बंदोबस्त तसेच विविध तुकड्या आळंदीत तैनात करण्यात आल्या आहेत. संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रा शांततेत पार पडण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून चोख व्यवस्था केली जात आहे.

मंगळवारी (दि. 5) श्रीगुरु हैबतबाबांच्या पायरी पुजनाने संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात होते. शनिवारी (दि. 9) कार्तिकी एकादशी तर सोमवारी (दि. 11) संजीवन समाधी दिन आहे. त्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक अलंकापुरीत दाखल होत आहेत. इंद्रायणीकाठी आठ दिवस हा वैष्णवांचा मेळा भरणार असल्याने प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी सर्व तयारी केली आहे.

संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिर समितीचे विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांसह मंदिर परिसर, दर्शनबारी, इंद्रायणी घाट परिसराची पाहणी केली. यावर्षी सुमारे आठ लाख भाविक आळंदी नगरीत येतील असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, नगरपरिषद, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तयारी केली जात आहे.

Gwalior-Daund Superfast Express : ग्वाल्हेर-दौंड सुपरफास्ट एक्स्प्रेसला तळेगाव स्टेशन जवळ आग, सुदैवाने दुर्घटना टळली

कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने परिसरात 150 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. भाविकांच्या गर्दीत चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी सध्या वेशातील पोलिसांची नेमणूक केली आहे. ठिकठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. पथारीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले, हॉकर्स यांना नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या जागेतच बसण्यास सांगितले जात आहे. इतर ठिकाणी हे व्यावसायिक आपला व्यवसाय करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

यात्रेच्या कालावधीत भाविक इंद्रायणी नदीत अंघोळ करतात. मागील काही दिवसात इंद्रायणी नदीचे वाढलेले प्रदूषण लक्षात घेता आंद्रा धरणातून 100 क्युसेक आणि वडिवळे धरणातून 150 क्युसेक पाणी सोडले जाणार आहे. यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी इंद्रायणी नदीत मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी असेल याची प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.

यात्रेत नगरपरिषद 20 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणार आहे. 24 तास स्वच्छता राखली जाणार आहे. 400 तात्पुरते शौचालय, महिलांसाठी चेंजींग रुम, 3 अग्नीशमन बंब तैनात असून 3 रेस्क्यू बोटी इंद्रायणी नदीत (Alandi) असतील.

पोलिसांचा बंदोबस्त
सहायक पोलीस आयुक्त – 6
पोलीस निरीक्षक – 34
पोलीस उपनिरीक्षक – 147
पोलीस अंमलदार – 855
वाहतूक पोलीस अंमलदार – 280
होमगार्ड – 950
एसआरपीएफ – 2 कंपनी
एनडीआरएफ – 1 कंपनी
बीडीडीएस – 2 पथके

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.