Pimpri News : ठाकरे सरकारकडून तरुण पिढीला देशोधडीला लावण्याचे काम – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – वाईनला किराणा दुकानात व मॉल मध्ये विक्रीस परवानगी देऊन तरुण पिढीला देशोधडीला लावण्याचे काम राज्यातील ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केला.

गोरखे म्हणाले, एकीकडे कोरोनाचे निर्बंध लागू असताना महाराष्ट्रात ठाकरे सरकारने वाईन किराणामाल व मॉल मध्ये सहजरीत्या कोणालाही मिळू शकते हा निर्णय घेतला. या निर्णयाला सर्व स्तरातून कडाडून विरोध होत आहे. कॉलेजमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना सहजगत्या कुठेही वाईन उपलब्ध होऊ शकणार आहे. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? कारण सरकार आपले आर्थिक उत्पादन वाढविण्यासाठी येणाऱ्या पिढीचे भविष्य अंधारात टाकत आहे.

मॉलमध्ये जाणारे अनेक तरुण वर्ग आहे. आज सरकारने मॉल मध्ये दारू विकण्याची परवानगी दिलेली आहे. तर भविष्यात हे मॉल व दुकानामध्ये दारू पिण्याची परवानगी देतील. त्यामुळे या राज्यातील तरुण वर्ग दारूच्या आहारी गेल्याशिवाय राहणार नाही. कारण अडीच ते तीन वर्षापासून त्यांनी शिक्षणाचे दारं बंद करून ठेवलेले आहेत तसेच महाराष्ट्राला दारिद्र्यात खेचण्याचे निर्णय सरकारने घेतला आहे.

गरीब विद्यार्थ्यांना, युवकांना शिक्षण नाही, टॅब नाही याकडे लक्ष द्यायचे सोडून असले निर्णय सरकार कसे घेऊ शकते? पालक वर्गातून यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहे. या निर्णयाचा जाहीर निषेध करतो. ताबडतोब हा निर्णय मागे घ्यावा असे आवाहन सरकारला करतो असे गोरखे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.