Pimpri News : निष्क्रियता झाकणे अन् शहराध्यक्षपद वाचविण्यासाठी संजोग वाघेरे यांची भाजपवर टीका – अमोल थोरात

एमपीसी न्यूज – प्राधिकरणाच्या साडेबारा टक्के परताव्याच्या प्रश्नावरून झोपेतून जागे झाल्यासारखे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे टीका करत आहेत. परंतु, ते हे विसरले की पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप सत्तेत येण्याअगोदर पंधरा वर्ष राष्ट्रवादी सत्तेमध्ये होती. केंद्रात आणि राज्यात देखील यांची सत्ता असताना तेव्हाच हा प्रश्न त्यांनी का सोडवला नाही? आता निष्क्रियतेला झाकण्यासाठी आणि शहराध्यक्षपद वाचवण्यासाठी त्यांच्याकडून भाजपवर टीका केली जात असल्याचा पलटवार भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात यांनी केला.

राज्य सरकारने स्थानिक भूमीपूत्र शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्याचा प्रश्न तसाच लटकवत ठेवल्याचा आरोप आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला होता . यावरून वाघेरे यांनी टीका केली. त्या टीकेला थोरात यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

ते म्हणाले, प्राधिकरणाची 1972 मध्ये स्थापना झाली. त्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील भूमीपूत्र शेतकऱ्यांच्या जागांचे संपादन झाले. त्या मोबदल्यात बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देण्याचा 15 सप्टेंबर 1993 रोजी निर्णय झाला. मात्र तो 1984 नंतरच्या जमीन संपादनासाठीच लागू करण्यात आला. हा निर्णय 1972 ते 1983 दरम्यान जमीन संपादन झालेल्या शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक होता.

हे बाधित शेतकरी साडेबारा टक्के जमीन परतावा मिळावा म्हणून चार दशकांपासून न्याय हक्काची मागणी करत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 1972 ते 1983 दरम्यानच्या प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांनाही न्याय देण्याचा निर्णय घेतला गेला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची खुर्ची सध्या धोक्यात आहे. त्यांच्या ऐवजी नवीन शहराध्यक्ष नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आपल्या निष्क्रियतेला झाकण्यासाठी आणि आपली खुर्ची वाचवण्यासाठी संजोग वाघेरे प्रसिद्धी निवेदने देण्याचा प्रपंच करीत आहेत. पत्रकबाजी करत आहेत. परंतु प्राधिकरणाच्या स्थापनेपासून सत्तेत असतानाही राष्ट्रवादीला प्राधिकरणाच्या प्रश्नाला सोडवता आले नाही. हे उघड गुपित आहे. जे राष्ट्रवादी नाकारू शकत नाही, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.