Article by VinodBhushan Alpe : स्वरमाऊली

एमपीसी न्यूज (पंडित विनोदभूषण आल्पे) – या पृथ्वीतलावर काही काही व्यक्ति अशा जन्मतात की त्यांची अलौकिक गुणवत्ता आणि कर्तुत्व पाहिल्यावर यांना मृत्यूच नसता तर किती बर झालं असतं, अस वाटल्याखेरीज राहत नाही. परंतु इतर प्राण्यांप्रमाणे मनुष्य हा देखील मर्त्यच आहे हे सत्य केव्हा न केव्हा अनुभवावेच लागते आणि त्याचा धक्का आणि दुखः हे पचवावेच लागते .

जगभर ज्यांच्या गायनाचा आवाज घुमला आणि गाजला त्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर गेल्या त्यावेळी हाच अनुभव आपल्याला आला. वास्तविक वयाच्या 93व्या वर्षी संपूर्ण जीवन जगून आणि आपली गायनाची कारकीर्द मागे टाकल्यावर सुद्धा त्यांच्या या जगात नसण्याची कल्पना ज्याचे कान सुरेल आहेत अशा कुठल्याही व्यक्तिला सहन होत नाही.

सुरांची जन्मजात देणगी लाभलेल्या या गायिकेला आणखी एक देणगी लाभली होती ती म्हणजे आपल्याला मिळालेल्या अलौकिक अशा यशापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याची अजब किमया जी त्यांना साधली होती. नव्याने भेटलेल्या कुठल्याही माणसाला त्या आपण कुणीतरी जगावेगळ्या आणि महान व्यक्ति आहोत अशी शंका सुद्धा येणार नाही अशा तर्‍हेने वागत याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे.

त्याचे झाले असे की, श्रीनिवास खळे यांना पंडित भीमसेनजी आणि लता मंगेशकर या दोघांच्या आवाजात काही भक्तिगीते ध्वनीमुद्रित करायची होती. त्यासाठी केलेल्या चाली त्यांना स्वत:च्या आवाजात तातडीने ध्वनिमुद्रित करून दोघांना पाठवायच्या होत्या. एखादा तबलजी त्यासाठी उपलब्ध होईल का, हे विचारण्यासाठी त्यांचा मला फोन आला मी काही नावे सुचवली पण ते उपलब्ध नव्हते. तेव्हा मी त्यांना म्हणालो की मी स्वत: तबल्याची साथ करतो, चालेल का? ते मला माझ्या गाण्यामुळे चांगले ओळखत होते . ते म्हणाले ताबडतोब ये .

मी गेलो आणि त्या चाली त्यांनी भीमसेनजी आणि लताजींना पाठवले अशारीतीने त्या उपक्रमाशी माझा संबंध आल्यामुळे मी रेकॉर्डिंगला उपस्थित राहिलो. त्या दिवशी दीदींचे एक सोलो भजन ध्वनीमुद्रित होणार होते. वाद्य जुळली होती आणि दीदी बारीक डोळे करून सर्व वाद्ये सुरात आहेत की नाही, याचा अंदाज घेत होत्या. दरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की, वाद्यांपैकी तानपुरा काही सुरात नाही. त्या गाण्याच्या केबिन मधून बाहेर आल्या आणि हार्मोनियम वादक चंद्रचूड वासुदेव यांना म्हणाल्या “ तानपूरयात गडबड आहे ना?” ते मला ओळखत होते कारण कुमार गंधर्वांच्या साथीला तानपुर्‍यावर त्यांनी मला अनेकदा पाहिले होते .

ते माझ्याकडे वळून म्हणाले , “ आल्पे, जरा तानपुरा बघतोस का?” अचानक आलेल्या या कामगिरीने मी क्षणभर गडबडलो पण लगेच तानपुर्‍याकडे गेलो आणि वादकाच्या हातातून तो काढून घेऊन जुळवू लागलो आणि माझ्या लक्षात आले की माझ्या मागोमाग दीदी ही तेथे आल्या. खरं म्हणजे त्या तानपुऱ्याची अवस्था पाहून माझ्या पोटात गोळा आला होता. मी तो जुळवतो आहे आणि साक्षात लता मंगेशकर ते ऐकत आहेत असे अपूर्व दृश्य तेथे निर्माण झाले .

ज्याची मी कधी कल्पना ही केली नव्हती. जगातली सर्वात सुरेल गायिका माझ्या शेजारी उभी होती आणि तो जुनाट तानपुरा जुळवण्याची खटपट मी करत होतो. नंतर पाहिले तर त्याला जव्हारी नव्हती आणि त्यासाठी घातलेले दोरे फारच जाड होते,  त्यामुळे तो जुळणे शक्य नाही हे माझ्या लक्षात आले होते, पण दिदीना ते कसे सांगायचे हा प्रश्न क्षणभरच मला पडला . मी त्यांना म्हणालो “ दीदी , हा तानपुरा जुळणे शक्य नाही!” “ का हो ?” “ अहो याला फुलाच्या पुडीचे दोरे जव्हारीसाठी घातले आहेत. तो एकसारखा कसा वाजणार!” हे ऐकून दीदी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या “ ठेऊन द्या बाजूला !” तंबोरा वाजवणार्‍या माणसाने चेहेरा पाडून तानपुरा माझ्याकडून घेऊन बाजूला ठेवला.

दीदिनी त्याचा चेहेरा पाहिला आणि त्या त्याला म्हणाल्या “ काळजी करू नका तुमचे मानधन तुम्हाला मिळेल” क्षणात त्यांनी त्या माणसाच्या मनीचे भाव ओळखले होते. या प्रसंगानंतर मी रेकॉर्डिंग बूथ मध्ये गेलो आणि खळे साहेबांच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. त्यांनी हसतमुखाने “ ये रे राजा” असे म्हणून माझे स्वागत केले. तेवढ्यात टेक सुरू झाला. लता दीदी गाऊ लागल्या आणि तो संपूर्ण टेक संपवूनच त्या थांबल्या त्या उत्तमच गायल्या होत्या त्यामुळे टेक ओके झाल्याचे सांगण्यासाठी खळे साहेब लताजींकडे जाऊ लागले आणि त्यांचा मागोमाग मी ही गेलो.

त्यांना गाताना समोरासमोर प्रथमच पाहिल्याने मी भारावलेला होतो. “राम भजन कर मन” हे ते गाणे. “छान झाले”खळे त्यांना म्हणाले पण त्या माझ्याकडेच पाहत होत्या आणि अचानक मला “नमस्कार” असे म्हणाल्या. मी चांगलाच गांगरलो आणि ओशाळलो देखील कारण सर्व गडबडीत मी त्यांच्या पाया पडायला विसरलो होतो वास्तविक त्या जगप्रसिद्ध व्यक्तिला मला ओळख देण्याचे काहीच कारण नव्हते पण हेच त्यांचे ते साधेपण गाऊन झाल्यावर जणू काही आपण लता मंगेशकर आहोत हे त्या जणू विसरल्या होत्या . मी ज्याला आपल्या यशापासून लगेच अलिप्त होणे म्हणतो ते हेच जे मी स्वता अनुभवले .

आपल्याला सुरेलपणाची देणगीच आहे त्यासाठी काही विशेष प्रयास करावेत लागत नाहीत असे त्या एकदा पंडित हृदयनाथ मंगेशकरांना मुलाखत देताना एकदा म्हणाल्या होत्या पण ते अर्ध सत्य असावे असे मला वाटते. माझे शास्त्रीय संगीताचे गुरु पंडित निवृत्तीबुवा सरनाईक नेहमी म्हणत , “ गायक दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे नैसर्गिक सुरेल आणि दुसरे प्रयत्नपूर्वक रियाजाने सुरेल झालेले, परंतु नैसर्गिक सुरेल असलेल्यांना सुद्धा आपल्या सुरांवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी रियाज हा करावाच लागतो तरच ते जन्मभर सुरेल राहू शकतात .” दीदी या प्रकारच्या गायकांपैकी असल्या पाहिजेत म्हणूनच साठ सत्तर वर्षे या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर त्या राहू शकल्या आणि याच साधनेने त्यांना त्यांच्या अलौकिक यशापासून अलिप्त ठेवले. ज्या प्रमाणे सचिन तेंडुलकरचे लक्ष आपण चेंडू बॅट च्या मधोमध खेळतो आहोत की नाही याकडे असे तसेच दिदींचे लक्ष आपण सुरात आहोत की नाही या कडे असले पाहिजे .

सध्या तरी मी दिदींचे गाणे ऐकणे टाळतो आहे .कारण मला ढसढसा रडायला आवडत नाही, हे टाळण्यासाठी सध्या तेवढा एकच उपाय मला दिसतो आहे, पण या जागतिक आवाजाला टाळणे कुणाला तरी शक्य होईल काय?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.