Pune News : पुणे महापालिकेच्या प्रभागांच्या प्रारूप रचनेवर तब्बल 500 हरकती व सूचना

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या 58 प्रभागांच्या प्रारूप रचनेवर नागरिकांकडून गेल्या दहा दिवसांत तब्बल 500 हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.  

निवडणूक आयोगाने गेल्या 1 फेब्रुवारी रोजी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे , यावर 14 फेब्रुवारीपर्यंत दुपारी तीनपर्यंत नागरिकांना आपल्या हरकती व सूचना दाखल करता येणार -आहेत. महापालिकेच्या सावरकर भवन येथील निवडणूक कार्यालयात तसेच 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिक आपल्या हरकती व सूचना दाखल करू शकतात.

शहरातील प्रभाग रचना ही पहिल्यापासूनच वादात सापडली असून, अनेकांनी या विरोधात हरकती नोंदविण्याची तयारी दर्शविली आहे. शहरात चार सदस्यांचे प्रभाग तीनचे झाल्यावर या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. अनेक प्रभाग तर पूर्णत: बदलले गेले आहेत. प्रत्येक प्रभागात काही ना काही त्रूटी असलेला आक्षेप स्थानिक इच्छुकांनी घेतला आहे.

14 फेब्रुवारीपर्यंत दाखल झालेल्या सर्व हरकती 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर 26 फेब्रुवारीला या हरकती व सूचनांवर सुनावणी होणार असून, त्यानंतर बुधवारी (2 मार्च) शहरातील अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.