Pune News : ‘फी’साठी पैसे  मागितल्याने बायकोला विहिरीत ढकलले, पुण्याच्या मंचर येथील घटना

एमपीसी न्यूज : फी साठी लागणारे पैसे मागितल्याने एका पतीने पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून देण्याचा प्रकार उघडकीस आला. सुदैवाने या घटनेत पत्नीचे प्राण वाचले आहेत. मंचर घोडेगाव रस्त्यालगत सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार पती अनिल श्रीराम राठोड यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेचा पती अनिल राठोड हा एका महाविद्यालयात असिस्टंट म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी पत्नीने त्याच्याकडे शिक्षणासाठी आवश्यक असलेली फी मागितली. या वेळी पती अनिल राठोड यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि माहेरून पैसे घेऊन ये असे तो तिला म्हणाला. यावरून त्यांच्यात भांडण झाले.

यावर पत्‍नीने एक तर तुम्ही मला पैसे द्या किंवा माहेरी नेऊन सोडा असे सांगितले. त्यानंतर माहेरी नेऊन सोडतो असे सांगून दोघेही घराबाहेर पडले. गोड बोलून अनिल राठोड यांनी पत्नीला मंचर घोडेगाव रस्त्यावर नेले आणि कोणीही नसल्याचे पाहून एका विहिरीत ढकलून दिले. सुदैवाने फिर्यादी या घटनेतून बचावले त्यानंतर त्यांनी अनिल राठोड विरोधात पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.