_MPC_DIR_MPU_III

Pimpri : सीसीटीव्ही कॅमे-यांच्या निगराणीखाली असलेले एटीएम सेंटर असुरक्षित

एमपीसी न्यूज – मागील आठवड्यात चाकणमध्ये एटीएम चोरून नेल्याचा प्रकार घडला. देहूगावमध्ये एक एटीएम फोडून चोरट्यांनी रोकड पळवली. तर चाकण येथे आणखी एक एटीएम फोडण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. या सर्व घटना पाहता सीसीटीव्ही आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या निगराणीखाली असलेले एटीएम सेंटर मागील काही दिवसांपासून चोरट्यांच्या टार्गेटवर आली आहेत. सुरक्षा रक्षक नसल्याने तसेच आसपासच्या परिसरात मानवी वर्दळ नसल्यास एटीएम फोडीच्या घटना घडत आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

एटीएमच्या येण्याने बँकिंग क्षेत्रात ऐतिहासिक क्रांती केली. बँकेशिवाय केवळ मशीनवरून बहुतांश बँकिंगचे व्यवहार होऊ लागले. पिंपरी-चिंचवड शहरात विविध बँकांची एटीएम सेंटर आहेत. एटीएम सेंटरमध्ये मशिनच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची आवश्यकता आहे. मात्र, अनेक बँकांनी सीसीटीव्ही कॅमेरे सेंटरमध्ये पाळत ठेवत असल्याचे सांगत सुरक्षा रक्षक ठेवण्यास हात वर केले आहेत. जास्त रहदारीच्या ठिकाणी तरी सुरक्षा रक्षक असणे आवश्यक आहे. सध्या बहुतांश ठिकाणी ‘इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स सिस्टीम’द्वारे एटीएम सेंटरमध्ये लक्ष ठेवले जात आहे. सेंटरमध्ये एखादा अनुचित प्रकार घडल्यास मशिनचा अलार्म वाजतो. तसेच सीसीटीव्ही कॅमे-यांवर पाळत ठेवणा-या नियंत्रण कक्षाकडून तात्काळ संबंधित पोलिसांना माहिती देण्यात येते. असे असले तरीही मागील काही दिवसांपासून एटीएम सेंटरमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

देहूगावात एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एटीएमचा काही भाग फोडल्याचा प्रकार २ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला. ही माहिती बँकेला समजली असता बँकेने मशिनमध्ये भरलेल्या रकमेची मोजणी केली. त्यातून 91 हजार 300 रुपये चोरून नेल्याचे समोर आले. कॅमे-यांच्या निगराणीखाली असलेली एचडीएफसी बँकेचे एटीएमच चोरून नेल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी पहाटे चाकणमधील चंदश्री कॉम्प्लेक्स येथे उघडकीस आली. या घटनेत चोरट्यांनी एकूण 18 लाख 98 हजार 700 रुपयांचा माल पळवला. स्कॉर्पिओ कारमधून आलेल्या चोरट्यांनी एटीएमसेंटर मधील एटीएम भोवती मोठी दोरी गुंडाळली. त्याआधारे एटीएम स्कॉर्पिओ कारमध्ये घालून नेले.

दरम्यान, 5 नोव्हेंबर रोजी पहाटे निगडी प्राधिकरण येथील एसबीआय एटीएम सेंटरमधील कॅश डिस्पेंसर मशिन तोडून उचकटण्याचा प्रयत्न केला. एकापाठोपाठ तीन एटीएम फोडी आणि चोरीच्या घटना घडल्या. यामुळे शहरातील पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर, गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा चाकण जवळ महाळुंगे गावात एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणा-या दोन चोरट्यांना चाकण पोलिसांनी शिताफीने अटक केली. चोरटे चोरी करत असताना मशीनचा अलार्म वाजला. याची माहिती बँकेच्या मुख्य कार्यालयात समजली. कार्यालयातून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. माहिती मिळताच सतर्क पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून चोरट्यांना अटक केली.

पोलीस उपायुक्त स्मिता पाटील म्हणाल्या, “एटीएम सेंटरच्या सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी सतर्क राहायला हवे. नागरिकांनी देखील खबरदारी घ्यायला हवी. संशयित व्यक्ती एटीएम सेंटर अथवा परिसरात आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यायला हवी. एटीएम मधील अलार्म सिस्टिमची वेळोवेळी तपासणी करावी. आधुनिक सुरक्षा संसाधनांचा सुरक्षेच्या बाबतीत वापर करावा. प्रत्येक एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक असायलाच हवा.”

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.