Pimpri News : कोणत्या नियमानुसार माजी नगरसेवक लेटरहेडवर पालिकेची ‘मुद्रा’ वापरु शकत नाही? – बाबू नायर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाच वर्षांता कार्यकाळ संपलेले नगरसेवक कोणत्या नियमानुसार लेटरहेडवर, मोटारीवर महापालिकेची ‘मुद्रा’ वापरु शकत नाहीत, असा सवाल भाजपचे सरचिटणीस, माजी स्वीकृत नगरसेवक बाबू नायर यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे. त्याबाबत खुलासा करण्याची मागणी केली तसेच आता मध्यस्थाची गरज नसल्याच्या आयुक्तांच्या विधानावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ 13 मार्च रोजी संपला आहे. प्रशासकीय राजवट सुरु झाली आहे. नगरसेवक लेटरहेडवर, मोटारीवर महापालिकेची मुद्रा वापरु शकत नाहीत अशी भूमिका प्रशासनाने घेतली. त्याला नायर यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, लेटरहेड वापरत असताना माजी लिहिणे आवश्यक आहे. नगरसेवक होता म्हणून मुद्रा वापरली जात होती. नगरसेवक नसताना मुद्रा वापरणे चुकीचे आहे. पण, माजी झाल्यानंतर नगरसेवकांनी लेटरहेडवर मुद्रा वापरु नये, मोटारीवर मुद्रा लावू नये असे कोणतेही परिपत्रक नाही. पुण्यात देखील मी त्याची माहिती घेतली. कोणत्या नियमानुसार मुद्रा वापरता येत नाही, त्याचा प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली.

आयुक्तांनी कामांसाठी आता मध्यस्थाची गरज भासणार नाही असे भाष्य केले. त्यावरुन नाराजी व्यक्त करत नायर म्हणाले, नगरसेवक फक्त मध्यस्थ होते की महापालिकेच्या कामकाजाचा भाग होते हे मला समजले नाही. महापालिका मध्यस्तीच्या माध्यमातून काम करत नाही. नगरसेवक मध्यस्थी म्हणून काम करत नाहीत. ते जनतेच्या प्रतिनीधीत्व करतात. लेटरहेडवरील मुद्रा वापरणे, मध्यस्थ शद्बाबाबतची शंका दूर करण्याची मागणी नायर यांनी प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.