Pimpri News : कोरोनामुळे पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकला राज्य सरकारचा ‘रेड सिग्नल’

एमपीसी न्यूज – पुणे ते लोणावळा दरम्यान रेल्वेचा तिसरा व चौथा मार्ग प्रस्तावित करून उपनगरीय कॉरिडॉर विकसित करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 50 टक्के आणि राज्य सरकारने 50 टक्के खर्च करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र रेल्वेच्या या नियोजनाला राज्य सरकारने खोडा घातला असून, कोविडच्या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांमुळे पुणे ते लोणावळा दरम्यान प्रस्तावित केलेल्या रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गासाठी खर्चाचा 50 टक्के हिस्सा देण्यास असमर्थता दर्शवल्याचा आरोप आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केलेल्या कपात सूचनेनंतर मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरातून ही बाब समोर आल्याचेही त्यांनी सांगितले. लोणावळा ते पुणे दरम्यान रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्याची योजना आहे. त्याअंतर्गत तिसरा व चौथा रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. राज्य सरकारने आपल्या वाट्याचा 50 टक्के हिस्सा मंजुरीसाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी होती. त्याला राज्याचे नगरविकास तसेच मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लेखी उत्तर दिले.

उत्तरात काय म्हटले आहे?

“पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी 2015-16 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पिंक बुकमध्ये 800 कोटी खर्चाचा समावेश करण्यात आला होता तसेच या मार्गासाठी 943 कोटी 60 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. रेल्वे बोर्डाने 11 डिसेंबर 2015 रोजी या प्रकल्पाचे काम मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनला दिले होते. त्यानंतर रेल्वे बोर्डाने 27 मे 2016 रोजी पुणे-लोणावळा दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गासाठी प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनचे नाव घोषित केले. त्यानंतर पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या उपनगरीय रेल्वे मार्गाच्या कामाचा 2017-18 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पिंक बुकमध्ये समावेश करण्यात आला.

या दोन्ही प्रकल्पाचे काम मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनला देण्यात आले तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल अद्ययावत करण्याच्या आणि उपनगरीय वाहतूक व वाणिज्यिक विकासाबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांनी 29 डिसेंबर 2015 रोजी राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला. त्यामध्ये पुणे ते लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम रेल्वे मंत्रालय व महाराष्ट सरकार यांच्या सहभागाने सुरू करण्यास मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी मान्यता दिल्याचे नमूद केले.

त्यानंतर राज्य सरकारने मोफत व नाममात्र भाडेदराने उपलब्ध करून द्यावयाच्या किंमतीचा राज्याच्या 50 टक्के हिश्श्यामध्ये विचारात घेणे तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत आर्थिक सहभाग देण्याच्या अटीवर तिसऱ्या व चौथ्या उपनगरीय रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली. त्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 23 फेब्रुवारी 2016 रोजी रेल्वे मंत्रालयाला कळवले. हा प्रस्ताव राज्याच्या नियोजन विभागाकडे सादर केल्यानंतर या विभागाने कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगाचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामामुळे कोणत्याही नवीन योजनांवर खर्च करण्यात येऊ नये तसेच नवीन योजना प्रस्तावित सुद्ध करू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.