Bhandara Dongar : भंडारा डोंगरावर साकारतेय नागरशैलीतले तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर!

एमपीसी न्यूज -जगद्गुरू संत तुकाराम महाराज (Bhandara Dongar) यांचे देहू परिसरातील भंडारा डोंगर येथे भव्यदिव्य असे मंदिर बांधण्यात येत आहे. तुकाराम महाराज यांना ज्या भंडारा डोंगरावर अभंग वाणी स्फुरली. त्या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्यात येत असून या मंदिराचे नागरशैलीत बांधकाम केले जात आहे. गुजरातमधील जगप्रसिद्ध अक्षरधाम मंदिराच्या आधारावर हे मंदिर उभे राहत असून मंदिराचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे.

मंदिराच्या बांधकाम व सुशोभीकरणासाठी जवळपास 200 ते 225 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भक्तांच्या आर्थिक सहाय्याच्या रूपाने निधी उभारला जात आहे. मंदिराचे बांधकाम हे 25 हजार स्क्वेअर फुट जागेत होत आहे. मंदिराची लांबी 179 फूट व उंची 87 फूट, तर रुंदी 193 फूट आहे. मंदिराला तीन भव्य कळस असतील. मंदिराचा कळस सुमारे 96 फूट ते 87 फूट एवढ्या मोठ्या आकाराचा असेल.

या ठिकाणी एकाच वेळी अनेक भक्त दर्शनाचा लाभ घेऊ शकतील. तर, मंदिराला छोटे 17 कळस असणार आहेत. मंदिराचा घुमट हा 34 फूट बाय 34 फूट या आकाराचा असेल. त्यामुळे मंडपाची शोभा वाढणार आहे. मंदिरात पाच गर्भगृह असणार असून 13.5 फूट बाय 13.5 फूट आकाराचे असतील. गर्भगृहाला पाच दरवाजे आणि सहा खिडक्या असतील. मंदिराला एकूण 9 दरवाजे असतील. मंदिराचे फाउंडेशन जवळपास नऊ फुटाहून अधिक घेण्यात आले आहे.

मंदिरात मुख्य जागेवर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची चार फूट उंचीची मूर्ती ही समोरच्या बाजूला बसविण्यात येणार आहे. मंदिरात भक्तांसाठी प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग असणार आहे. मंदिराच्या मंडपावर व भिंतींवर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम व कोरीवकाम केलेले असेल.

मंदिराच्या छतावर देखील नक्षीकाम पहावयास मिळणार आहे. मंदिराच्या बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोणाकृती असतील, त्यावर वैष्णवांच्या तब्बल 2200 मूर्तींचे कोरीव काम केलेले असेल. मंदिराच्या समोर उजवीकडे व डावीकडे शृंगार चौक असतील.

तुकाराम महाराजांनी ज्या वृक्षाखाली बसून गाथा लिहिली. तो नांदूरकी वृक्ष देखील (Bhandara Dongar) मंदिराच्या बाहेरील भागात मंदिराचाच एक घटक म्हणून असणार आहे. 122 खांबांवर हे मंदिर उभे राहणार असून, यामध्ये कोणत्याही प्रकारचे लोखंड वापरण्यात आलेले नाही. इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये हे बांधकाम करण्यात येत आहे. यातील प्रत्येक पिलरमध्ये प्रत्येकी 24 मूर्ती असणार आहेत.

Pimpri : राष्ट्रीय श्रमिक संघटनेच्या खजिनदाराला 16 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी अटक

विशेष म्हणजे स्लॅब हा दगडांमध्ये बनणार असून, 12 ते 15 फूट आकाराच्या भव्य दगडांमध्ये हा स्लॅब असणार आहे. डोंगराच्या पायथ्याला भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. स्वागत कमानीत वरच्या बाजूला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची विनाधारी मूर्ती तर स्वागत कमानीच्या समोर गोल रिंगन असून, त्याच्या मध्यभागी मुरली वाजवतानाचा श्रीकृष्ण व चारी बाजूला गायी असणार आहेत. कमानीच्याच बाजूला फूड कोर्टचेही नियोजन करण्यात येणार आहे.

मंदिर उभारण्यासाठी वास्तुविशारद म्हणून गांधीनगरच्या अक्षरधाम व अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा व वास्तुविशारद परेशभाई सोमपुरा हे काम पाहत आहेत. सोमपुरा यांनी आजपर्यंत गुजरातमधील सोमनाथ मंदिर, अक्षरधाम ग्रँड मेमोरियल, अयोध्येतील श्रीराम मंदिर, हिंदू जैन मंदिर यूएसए, सप्तयतन मंदिर एक धर्मक्षेत्र, लक्ष्मीनारायण मंदिर उधाणा अशा मोठ्या मंदिरांची कामे त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहेत.

अभियंता मानशंकर सोमपुरा म्हणाले की, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे हे भव्य मंदिर नागरशैलीमध्ये उभारण्यात येत आहे. या शैलीतील महाराष्ट्रातील हे पहिलेच भव्य मंदिर आहे. या मंदिरासाठी बन्सी पहाडपूर गुलाबी दगड व मकराना पांढरा सफेद दगड वापरण्यात येत आहे. पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये या मंदिराचे काम पूर्णत्वास जाईल.

भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद म्हणाले, मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून ट्रस्टला देणगी मिळत आहे. या देणगीची मंदिराच्या बांधकामासाठी मोठी मदत होणार आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे येऊन मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हाताने मदत करावी. जेणेकरून मंदिराचे बांधकाम लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.