Bharat Biotech : मुलांना कोव्हॅक्सिन लस दिल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा वेदना कमी करणाऱ्या गोळ्या देऊ नका; भारत बायोटेकचा सल्ला

एमपीसी न्यूज – मुलांना लस कोव्हॅक्सिन लस दिल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा वेदना कमी करणाऱ्या गोळ्या देऊ नका, असा सल्ला भारत बायोटेक कंपनीकडून देण्यात आला आहे. याबाबत कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन सरकारने 15 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. या वयोगटातील बालकांची लसीकरण मोहीम 3 जानेवारीपासून सुरू झाली आहे.

कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस मुलांना दिले जातील. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असेल. त्याच वेळी, भारत बायोटेकने मुलांवर कोवॅक्सीन (BBV152) च्या फेज 2 आणि फेज 3 च्या वैद्यकीय चाचण्यांचे निकाल देखील प्रसिद्ध केले आहेत.

“आम्हाला अभिप्राय मिळाला आहे की काही लसीकरण केंद्रे मुलांसाठी कोव्हॅक्सिनसह 500 मिलीग्रामच्या तीन पॅरासिटामॉल गोळ्यांची शिफारस करत आहेत. आम्ही लस घेतल्यानंतर कोणतीही पॅरासिटामॉल किंवा वेदना कमी करणाऱ्या गोळ्या घेण्याची शिफारस करत नाही. कोविड लसीच्या इतर काही डोससह पॅरासिटामॉल घेण्यास सांगितले जात आहे, पण लस घेतल्यानंतर असे कोणतेही औषध घेण्याचा सल्ला दिला जात नसल्याचे भारत बायोटेकने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.