Bhosari : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा कापला गळा; पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – कंपनीत एकत्र काम करणा-या तरुणीचा भाजी कापण्याच्या सुरीने गळा कापून खून केला. खून केल्यानंतर मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तरुणीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. २३) सकाळी सव्वानऊच्या सुमारास भोसरीमधील लांडेनगर येथे घडली.

सुमन जयसिंग चौहान (वय २२, रा. सद्गुरूनगर, भोसरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी रोहित जयसिंग चौहान (वय २४) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बरकत खलील अली (वय २०, रा. लांडेनगर, भोसरी. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुमन आणि आरोपी बरकत दोघेही भोसरी येथील के के यॉर्ड या हॅन्डग्लोव्ह्ज बनविणा-या कंपनीत काम करतात. मागील काही महिन्यांपासून सुमन कंपनीत कामाला लागली होती. शनिवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास कंपनीतील कामगार न्याहारीसाठी बाहेर गेले.

त्यावेळी बरकत याने सुमनच्या गळयावर भाजी कापण्याच्या सुरीने वार केले. सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडली. न्याहारी करून कामगार कंपनीत परत आले असता सुमन बेशुद्धावस्थेत आढळली. दरम्यान, आरोपी बरकत याने घटनास्थळावरून पळ काढला. सुमनचा खून केल्यानंतर तो आपल्या मूळ गावी निघण्याच्या तयारीत होता.

कंपनीतील कामगारांनी भोसरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. भोसरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या बरकत याला पुणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. बरकत याने एकतर्फी प्रेमातून व सुमनच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. सुमनचा भाऊ रोहित याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like