Pune News : प्रशासकाचा तडाखा! विकास कामांची तपासणीनंतरच बिले मिळणार

एमपीसी न्यूज – आर्थिक वर्षाच्या शेवटी मंजूर झालेल्या आणि खासगी जागांत केलेल्या कोणत्याही कामांची बिले दिली जाणार नाहीत तसेच शेवटच्या टप्प्यात करण्यात आलेल्या विकास कामांची तपासणी करूनच कामांची बिले काढली जातील, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. अतिक्रमण विरोधात कारवाई, मिळकती वापराची पडताळणी, या पाठोपाठ आता माजी नगरसेवकांना आयुक्तांनी आणखी एक धक्का दिला आहे.

महापालिकेचा कालावधी आणि आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी प्रभागातील कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांची चांगलीच धावपळ सुरू होती. कामांच्या निविदा काढणे, त्याला मंजुरी मिळविणे, प्रत्यक्षात काम सुरु करण्याचे आदेश निघेपर्यंत नगरसेवकांच्या जीवात जीव नव्हता. न केलेल्या कामाची बिले आर्थिक वर्षाच्या शेवटी काढण्याचे अनेक प्रकार यापुर्वी घडले आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी काही माननीयांनी खासगी जागेतही विकास निधी खर्ची केला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना विक्रम कुमार म्हणाले, महापालिकेच्या कामांची तपासणी करण्यात येणार आहे. पंचवीस टक्के कामांची तपासणी ही क्षेत्रीय कार्यालयांना करण्यास सांगितले आहे. त्यानंतर अतिरीक्त आयुक्त हे देखील काही कामांची तपासणी करतील, मी स्वत: देखील काही ठिकाणी अचानक भेट देऊन कामांची तपासणी करणार आहे. यामध्ये चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामांची बिले काढली जाणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.