BopKhel News : प्रशासकीय राजवटीत बोपखेल पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष; माजी उपमहापौरांचा आरोप

एमपीसी न्यूज – बोपखेल व खडकीस जोडणा-या मुळा नदीवरील(BopKhel News) पुलाचे काम प्रशासकीय राजवटीत अतिशय संथ गतीने सुरु आहे. प्रशासनाच्या या संथ कारभाराचा बोपखलवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी असताना पुलाचे 90 टक्के काम पूर्ण झाले मात्र प्रशासकीय राजवटीत दहा टक्के कामाला घरघर लागली.

दीड वर्षात केवळ 10 टक्के काम पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप माजी उपमहापौर हिराबाई घुले यांनी केला. रखडलेले 10 टक्के काम तत्काळ पूर्ण करावे आणि पूल बोपखेलवासीयांसाठी खुला करण्याची मागणीही त्यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त तथा(BopKhel News) प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात माजी उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे बोपखेल गावासाठी दापोडीतील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगने (सीएमई) हद्दीतून जाणारा हा नागरी रस्ता अचानक 13 मे 2015 रोजी बंद करण्यात आला. तेव्हापासून बोपखेलच्या रहिवाशांना सुमारे 15 किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये-जा करावी लागत आहे.

kartiki Ekadashi : कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्राच्या हस्ते करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु

मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्यासाठी आम्ही नगरसेवकांनी, आमच्या नेत्यांनी पाठपुरावा केला. बोपखेल व खडकीस जोडणारा 1 हजार 866 मीटर लांबीचा पुल उभारण्याचे काम सुरू केले.

आम्ही सतत आढावा घेत बोपखेलवरुन खडकी येथे जोडणा-या पुलाचे काम 90 टक्के पूर्ण करून घेतले. केवळ 10 टक्के काम शिल्लक होते. प्रशासकीय राजवटीत हे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती. परंतु, उलटे झाले. प्रशासकीय राजवटीत या कामासाठी प्रचंड विलंब होत आहे. कामाला ब्रेक लागल्याची परिस्थिती आहे. टप्प्या-टप्प्याने आणि अतिशय मंद गतीने काम सुरू आहे.

 

दीड वर्षात 10 टक्के काम पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे बोपखेल मधील नागरिकांचा वेळ, पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे.

नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. प्रशासकीय राजवट सुरु झाल्यापासून या पुलाच्या कामाकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बोपखेलवासीयांमध्ये नाराजीची भावना आहे. आयुक्तांनी स्वत: लक्ष्य घालून कामास भेट द्यावी. त्वरित काम पूर्ण करुन नागरिकांना वाहतुकीसाठी मार्ग खुला करावा. जेणेकरुन नागरिकांची वेळेची आणि पैशांची बचत होईल, अशी मागणी माजी उपमहापौर घुले यांनी निवेदनातून केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.