Bopodi Family Rescue: मुळा नदीच्या पुरात कारमध्ये अडकेलेल्या एकाच कुटुंबातील 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

एमपीसी न्यूज: बोपोडी मध्ये मुळा नदीच्या पुराच्या पाण्यातून कार मध्ये अडकेलेल्या एकाच कुटुंबातील 4 जणांना आणि त्यांच्या श्वावणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. (Bopodi Family rescue) ही घटना काल रात्री घडली आहे. काल दिवसभर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरमध्ये तसेच मावळ आणि मुळशी तालुक्यात पडणारया मुसळधार पावसामुळे मुळा नदी ओसंडून वाहत आहे.  त्यामुळे पुणे -मुंबई रेल्वे मार्गावरील हॅरीस पुलाखालील बोगद्यात पावसाचे पाणी तसेच शेजारील मुळा नदीचे पुराचे पाणी साचले होते.

ह्या बोगद्यातून पुणे मुंबई महामार्गावरून येणारी वाहने भाऊ पाटील रोडवरून औंध, रेंज हिल्स, पुणे विद्यापीठ, शिवाजीनगर व इतर ठिकाणी जातात. काल 13 जुलैला रात्री 7.30 वा च्या सुमारास टाटा सफारी कार या बोगद्याजवळ पाण्यात अडकली होती. पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने कार तेथे अडकली असावी. ह्या कार मध्ये लष्करी अधिकारी, त्यांची पत्नी व दोन मुले असे एकाच परिवारातील 4 जण अडकले होते. त्यांच्या सोबत त्यांचा पाळीव श्वान देखील होता.

 

संतातधार पाऊस असल्याने पुराच्या पाण्याची पातळी वाढून पूर्ण कार बुडण्याची भिती होती. त्यामुळे प्रसंगावधान दाखवत त्या अधिकाऱ्याने दोन्ही मुलांना कारच्या टपावर बसवले.(Bopodi Family Rescue) दोन्ही मुले छत्रीच्या खाली टपावर बसून मदतीची वाट पाहत होती. स्थानिक नागरिकांनी ही अडकलेली कार व त्यावरील मुले पाहून लगेच खडकी पोलिस ठाण्याला व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या अग्निशमन विभागाला कळवले. पोलीस व अग्निशमन विभागाची पथके 7.44 वा  घटनास्थळी पोहोचली व मदत कार्यास सुरुवात केली.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे आरोग्य अधीक्षक शिरीष पत्की यांनी सांगितले की, त्यांना ट्रॅफिक पोलीस विभागाचे राजेंद्र
डेंगळेनी कार अडकल्या बाबत कळवले. लगेच एक अग्निशमन बम्ब घटनास्थळी पोहोचला व अग्निशमन दलातील 3 कर्मचार्यांनी 5 ते 5.5 फूट खोल पाण्यात उतरून शिडीच्या मदतीने दोन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले. एका कर्मचाऱ्याने श्वाणाला खांद्यावर घेऊन पाण्यातून बाहेर काढले. सुदैवाने कारच्या खिडक्या उघड्या असल्याने त्यामधून आतील पती, पत्नी व श्वाणाला बाहेर काढता आले. कार मध्ये पाणी शिरले होते. पाणी पूर्ण कार मध्ये भरण्यापूर्वीच सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली.
अग्निशमन कर्मचारी सतिष कांबळे, प्रताप शिरस्वाल, पंकज तायडे, अजिंक्य वाळुंज, अतुल तरडे आणि विकास हरेर यांनी बचाव कार्य केले. अथक प्रयत्नानंतर 8.20 वा सर्व 4 जणांना व त्यांच्या श्वाणाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.