Chikhali News : संतपीठांतर्गत लवकरच ‘सीबीएसई स्कूल’ सुरू होणार; शिक्षक व कर्मचारी भरती प्रक्रिया राबविणार

आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा पाहणी दौरा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचा अभ्यास व्हावा, याकरीता राज्यातील पहिले संतपीठ टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत आहे. या संतपीठांतर्गत ‘सीबीएसई’ स्कूल सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षक व कर्मचारी भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे.

टाळगाव चिखली येथील नियोजित संतपीठाच्या कामाची भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज (बुधवारी) पाहणी केली.

नगरसेवक कुंदन गायकवाड, स्वीनल म्हेत्रे, साधना मळेकर, संतपीठाचे संचालक राजू महाराज, संचालिका स्वाती मुळे, महापालिका शिक्षण विभागाच्या अधिकारी जोत्स्ना शिंदे, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी पराग मुंढे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, संतपीठातील सीबीएसई स्कूलसाठी महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षक व कर्मचारी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा तयार केला आहे. संतपीठाच्या कामाला गती देण्यासाठी उपायुक्तांना जबाबदारी दिली असून, येत्या 6 तारखेपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, संतपीठाच्या कामाला गती देण्याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. येत्या 7 तारखेला याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी प्रकल्पाची सध्यस्थितीबाबत सादरीकरण करतील. डिसेंबर 2021 पर्यंत संतपीठाचे काम पूर्ण होईल, असा आमचा विश्वास आहे. यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.

श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रभरातून विद्यार्थी अध्यात्माचे ज्ञान मिळविण्यासाठी येतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेने संतपीठाची उभारणी करण्याचे ठरविल्याने या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

संतपीठाचे काम दोन टप्प्यांमध्ये होणार !

सध्यस्थितीला संतपीठाचे काम 40 टक्के पूर्ण झाले आहे. संतपीठाची इमारत तळमजला अधिक पाच मजले अशी असेल. एकूण बांधकाम क्षेत्र 13 हजार 161.71 चौरस मीटर आहे. दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा असेल. संतपीठात एकूण 48 वर्ग खोल्या, तीन कार्यालय, सात प्रयोगशाळा, तीन संगणक कक्ष, संगीत तथा वाद्य कक्ष असेल.

प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृह, विद्युत अग्निशमन व्यवस्था, कर्मचारी कक्ष, कार्यालय, एकूण 300 आसनक्षमता असलेले सभागृह अंतर्भूत करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शिक्षण देण्याबाबतचे काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये राहणे आणि जेवन यासह उर्वरित कामे मार्गी लावण्यात येणार आहेत.

काय आहे संतपीठ  संकल्पना ?

भारतीय संस्कृतीमध्ये संत- महंत यांनी समाजाच्या उत्थानासाठी लिहिलेले साहित्य नव्या पिढीला अभ्यासता यावे, या हेतुने महाराष्ट्रातील पहिले किंबुहूना देशातील पहिले संतपीठ वारकऱ्यांची पुण्यभूमि असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये साकारत आहे. संत साहित्याचे शिक्षण आणि सीबीएसई इंग्रजी माध्यमाची शाळाही याठिकाणी होणार आहे.

नर्सरी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शिक्षणाची येथे सुविधा आहे. कोरोना काळात व्हर्च्युअल पद्धतीने अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी ज्युनिअर आणि सिनीअर असे दोन वर्ग चालू होतील, अशी माहिती संतपीठाच्या संचालिका स्वाती मुळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.