Chikhali News: महापालिकेची मोठी कारवाई! करारनाम्याचे उल्लंघन करणा-या घरकुलमधील दोघांचा सदनिकेचा लाभ रद्द

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या चिखलीतील घरकुल योजनेतील दोन लाभार्थ्यांनी करारनाम्याचे उल्लंघन केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे दोन सदनिका धारकांचा सदनिकेचा लाभ रद्द करण्यात आला. त्यांनी भरलेली रक्कम जप्त करुन त्याचा ताबा महापालिकेकडे घेण्यात आला आहे. महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी ही कारवाई केली. जिलानी शमसुद्दीन अन्सारी आणि विजय संभाजी कबाडे यांचे लाभ रद्द करण्यात आले.

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना 10 वर्षापर्यंत सदनिका भाड्याने, विक्री करणे अथवा नातेवाईकास, मित्रास, परीचितास पोट भाड्याने देणे अथवा दान, तारण ठेवता येत नाही. अशा प्रकारचा करारनामा लाभार्थ्यांबरोबर झाला आहे. पण, अनेकांनी सदनिका भाड्याने दिल्याच्या तक्रारी आल्या होत्या. आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या पथकाने 4 सप्टेंबर 2021 व 2 ऑक्टोबर 2021 रोजी 5 हजार 838 सदनिकांची पाहणी केली होती. त्यावेळी 293 भाडेकरु, 91 नातेवाईक, 721 बंद, 5 विक्री आणि स्वत: वापरत असलेले 4 हजार 728 सदनिकांचा वापर होत असल्याचे आढळून आले होते. या सर्व लाभार्थ्यांना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आली होती.

त्यापैकी विक्री केल्याची माहिती प्राप्त झालेल्या पाच लाभार्थ्यांपैकी एका लाभार्थ्यांचा खुलासा मान्य झाला. उर्वरीत लाभार्थींना आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष सुनावणीसाठी 5 मार्च 2022 रोजी बोलविण्यात आले होते. या सुनावणीसाठी दोन लाभार्थ्यांनी उपस्थित राहून आपले म्हणणे सादर केले. तर, जिलानी शमसुद्दीन अन्सारी इमारत क्र. ए- 33 सदनिका क्रमांक 103 आणि विजय संभाजी कबाडे इमारत क्रमांक बी 14, सदनिका क्रमांक 502 हे अनुपस्थित राहिले. त्यांनी आपले म्हणणे सादर केले नाही. या लाभार्थ्यांनी अटी व शर्तींचा भंग केल्याने त्यांचा घरकुल योजनेतील सदनिकेचा लाभ रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

केंद्र व शासनाच्या सहकार्याने पिंपरी महापालिकेच्या वतीने सेक्टर क्रमांक 17 व 19 चिखली येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल राबविण्यात येत आहे. घरकुल प्रकल्पातील आजतागायत 139 इमारतींचे वाटप करण्यात आले आहे. 5838 लाभार्थींना सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे. या 5838 लाभार्थींबरोबर करारनामा झाला आहे.  सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून पुढील 10 वर्षापर्यंत ती सदनिका ति-हाईतास किंवा कोणत्याही नातेवाईकास, मित्रास अथवा परिचितास विकत किंवा पोटभाड्याने देता येणार नाही.

या सदनिकेवर पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, सहकारी सोसायटीच्या पूर्वसंमतीशिवाय गहाण, दान किंवा तारण इत्यादी बोजा उत्पन्न करता येणार नाही. घरकुल योजनेतील लाभार्थीने योजनेअंतर्गत मिळालेली सदनिका कोणत्याही व्यक्तीला भाड्याने, भाडेकरारनाम्याने दिल्याचे अथवा विकल्याचे निदर्शनास आल्यास सदनिकेचा ताबा रद्द करणेत येईल. तसेच त्यांच्यावर महापालिकेची फसवणूक केल्याबाबत फौजदारी कारवाई केली जाईल.  भरलेली सर्व रक्कम जप्त करण्यात येईल अशी तरतूद आहे. आर्थिकदुष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविलेल्या या योजनेमधील सदनिका भाड्याने दिल्याचे,  महापालिकेच्या संमतीशिवाय अटी -शर्तीचा भंग करून सदनिका विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास लाभ रद्द करण्याचे जाहीर केले  होते. त्यानुसार ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.