Chinchwad Bye-Election : बंडखोर उमेदवार भाजपचाच – जयंत पाटील

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत मत विभागणी व्हावी यासाठी भाजपने तिसरा उमेदवार उभा केला. मागच्यावेळी राष्ट्रवादीने काम केल्यामुळे या अपक्षाला 1 लाख 12 हजार मते पडली होती. ही मते एकट्याची नव्हती. (Chinchwad Bye Election) आता हा उमेदवार 20 हजाराच्या आत येईल. बंडखोर उमेदवार हा भाजपचाच असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.  

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. रहाटणी येथे झालेल्या सभेला माजी मंत्री धनंजय मुंडे, शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भास्कर जाधव, आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, सारंग पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, ”रस्त्यावरचा प्रचार घरात पोहोचविण्याचे काम करावे. घराचा मालक हो म्हणत नाही. तोपर्यंत घराबाहेर यायचे नाही. घरात जावून वाढलेले पेट्रोल, गॅसचे दर लोकांना सांगावी. अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडचा केलेल्या विकासाला देशात तोड नाही. देशात अनेक चो-या झालेल्या आपण ऐकतो. पण, पहिल्यांदाच पक्षाचे नाव, चिन्हाची चोरी झाली.

महाराष्ट्रातील जनता हे मान्य करणार नाही. लोकशाही संपविण्याचा उद्योग भाजपवाले करत आहेत. आमदारांनी घेतलेल्या निर्णयावरुन पक्षाची दिशा ठरणे योग्य नाही. (Chinchwad Bye Election)  महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. विरोधात बोलणा-यांवर ईडी, आयकरचा छापा टाकला जातो. भाजपने पंढरपूर, देगलूर, कोल्हापूरला निवडणूक बिनविरोध होवू दिली नाही”.

Maharashtra : बाळशास्त्री जांभेकरांच्या जनहितकारी पत्रकारितेचा वारसा पुढे न्यावा – मुख्यमंत्री

शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले, ”माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनेचे पावित्र्य राखले नाही. भाजपच्या गल्लीतील कार्यकर्त्याप्रमाणे राज्यपालांनी वर्तन केले. महाविकास आघाडी सरकारला छळले. अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. कोरोना कालावधीतही भाजपचे लोक महाविकास आघाडी सरकार आज, उद्या पडेल अशी विधाने दररोज करत होते. संकट, महामारीत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जनतेसाठी काम करणे आवश्यक होते. पण, भाजपला आपत्तीत सरकार उलथवून टाकण्याची संधी दिसत होती. त्यांना डाव साधता आला नाही. महाविकास आघाडी सरकारने जनतेला वाचविले. सर्वोच्च न्यायालयानेही महाविकास आघाडी सरकारचे कौतुक केले”.

”उद्धव ठाकरे तंदुरुस्त होवू नयेत असे भाजपला वाटत होते. ते आजारी असताना 40 गद्दारांना फोडून सरकार पाडले. देशात यापूर्वीही अनेक पक्षांतरे झाली. त्यांचे गट स्थापन झाले. त्यांना मान्यता दिली. पण, या देशात पहिल्यांदाच एका गटाला मूळ पक्षाचे चिन्ह आणि नावच दिले. निवडणूक आयोगाने देशाला जबरदस्त धक्का  दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र चिंताग्रस्त आहे. घटना, लोकशाही ठिकणार की नाही असा विचित्र कारभार देशात सुरु आहे. हिंदुत्व सोडल्या म्हणा-यांनी सुरुवातीला मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतली.(Chinchwad Bye Election) हिंदुत्वसाठी गेल्याचे मिंधे सांगताहेत हे सर्व खोटे आहे. मिंधे गटाने अंधेरीत निवडणुकही लढविली नाही. शिवसेनेची धनुष्यबाण निशानी गोटविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. आता धनुष्यबाण चोरुन गेले आहेत. बाळासाहेबांना काय वाटले असेल”, असेही ते म्हणाले.

”2014 साली भाजपने युती तोडली होती. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून एकट्या उद्धव ठाकरे यांनी 63 आमदार निवडून आणले. 2019 ला अमित शहा यांनी घरी जावून जबरदस्तीने युती करायला लावली. नरेंद्र मोदी यांचा फोटो असतानाही शिवसेनेच्या 56 जागा निवडून आल्या. महाराष्ट्राने मोदी यांचा फोटो आणि चेहरा कधीच स्वीकारला नाही. भाजप, गद्दारांनी बाळासाहेबांचा फोटो वापरु नये. फक्त मोदी यांचा फोटो लावावा. मोदी यांच्या फोटोने मते मिळणार नाहीत हे भाजप, मिंधे गटाला माहिती आहे. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरु नये. चिंचवडमधील बंडखोर उमेदवार शिवसेनेचा असू शकत नाही. पक्षप्रमुखांना घेरले जात असताना कोणीही निवडणूक लढला नसता. शिवसेनेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भाजपला धूळ चारावी”, असे आवाहनही जाधव यांनी केले.

माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, ”आंतरराष्ट्रीय पातळीवर पिंपरी-चिंचवडची ओळख शरद पवार यांच्यामुळे निर्माण झाली. अजित पवार यांनी दुरदृष्टी ठेवून शहराचा सर्वांगीण विकास केला. बारामतीपेक्षा जास्त प्रेम त्यांनी पिंपरी-चिंचवडवरांवर केले. पण, मागील पाच वर्षात भाजपने शहराची वाट लावली. पालिका भ्रष्टाचाराने बरबटली आहे. उद्यानातील गवतापासून कुत्र्यांच्या नसबंदीतही भ्रष्टाचार झाला. शहर विकासात मागे पडले. धरणे भरली असतानाही दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे”.

”देशातील लोकशाही तळागाळाला चालली आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पोटनिवडणुक महत्वाची आहे. यंत्रणांचा वापर करुन राज्यातील सरकार आले हे सर्वांना माहिती आहे. (Chinchwad Bye Election) सिंहासनासाठी सुरतेला लोंटागण घातले जात आहे. बनवाबनवीतून सरकार आले आणि आल्यानंतर पळवापळवी चालू झाली. उद्योग पळविले. आता महाराष्ट्रातील देव सुद्धा पळवून न्यायला लागले आहेत. भीमाशंकर देवस्थान हे आसामला असल्याचे सांगितले. आता उद्योगांप्रमाणेच दुसरे देवही आणून देवू असे सांगतील”, असेही मुंडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.