Chinchwad : मानवी वस्तीत बिबट्या; वेळीच उपाययोजना न केल्यास उद्भवणार ‘हा’ धोका

एमपीसी न्यूज – आठवडाभरापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील (Chinchwad) चिखली येथे दाट लोकवस्ती असलेल्या भागात बिबट्या आढळला. पाच तास रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला जेरबंद करण्यात आले. आतापर्यंत बिबट्या जंगल परिसरातील गावांमध्ये दिसल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र हा बिबट्या आता शहरात देखील दिसू लागला आहे. त्यामुळे बिबट्या जंगल सोडून शहरात का येऊ लागला, याच्या कारणांचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरते.

बिबट्या आढळल्यास नागरिकांकडून वन विभागाला माहिती मिळते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून आलेल्या कॉल्सच्या आधारे दोन्ही शहर परिसरात 25 बिबटे फिरत असल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. वन विभागाने याबाबत अधिकृत सर्वेक्षण केलेले नाही. मागील आठवड्यात चिखली मधील दाट लोकवस्तीत बिबट्या आढळला. त्यापूर्वी पुणे-नाशिक महामार्गावर बिबट्या आढळला. असे जिल्ह्याच्या विविध भागात सतत बिबट्यांचे दर्शन होत आहे.

नागरी भागात जंगली प्राणी येत असल्याने त्याबाबत योग्य ती सर्व प्रकारची खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत अशा प्राण्यांची हत्या, हाच पर्याय शिल्लक राहील, असे वन विभागाने अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगत आहेत.

पुणे जिल्ह्यात आणि जिल्ह्याला लागून मोठी वन संपदा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या जंगल परिसरात वणवे लागण्याच्या घटना घडतात. यामुळे जंगलातील तृणवर्गीय वनस्पती जळून जातात. या वणव्यांमध्ये त्यांचे बीजही नष्ट होत आहे. त्यामुळे या वनस्पतींवर जगणारे माकड, पक्षी, चितळ, सांबर, भेकर, ससा, सरपटणारे तृणभक्षी प्राणी इतरत्र स्थलांतर करतात. हे प्राणी खाऊन वाघ, बिबट्या आणि या वर्गातील इतर प्राणी आपली गुजराण करत असतात. यांचेही अन्न नष्ट झाल्याने अन्नाच्या शोधात हेही प्राणी इतरत्र स्थलांतर करतात.

Pimpri : राज्यातील स्टार्ट अप उद्योग वाढीसाठी ‘महा-60’ योजना उपयुक्त – अशोक जॉन

मानवी वस्त्यांमध्ये भटके श्वान, मांजर असे प्राणी असतात. त्यांची सहज शिकार करता (Chinchwad) येत असल्याने बिबट्या सारखे प्राणी मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. ग्रामीण भागातून आता हे शहरात देखील दाखल झाले आहेत. जंगलात दूरवर भटकून शिकार करावी लागते. त्यापेक्षा मानवी वस्त्यांमध्ये श्वान, मांजर अशा प्राण्यांची सहज शिकार करता येते. जंगलात बिबट्यासाठी नैसर्गिक शिकारी निर्माण झाला आहे.

त्यामुळे मानवी वस्तीत आढळणाऱ्या बिबट्याला पकडून जंगलात सोडणे हा पर्याय परिपूर्ण असू शकत नाही. त्याला अशा जंगलात सोडले पाहिजे, जिथे त्याला शिकारीसाठी मुबलक प्राणी उपलब्ध आहेत. जंगलात लागणारे वणवे, कमी होणारी लहान, तृणभक्षी प्राण्यांची संख्या, जंगलतोड, पाण्याची कमतरता अशा अनेक पातळ्यांवर काम होणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.