Chinchwad News: दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास महापालिका दोन लाखाचे अर्थसहाय्य करणार – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – शहरातील दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास अशा नवविवाहीत दाम्पत्यास संसारात मदत होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी आज (शुक्रवारी) जाहीर केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर ढोरे यांनी केले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्यासह उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, शहर सुधारणा सभापती अनुराधा गोरखे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या शर्मिला बाबर, निर्मला गायकवाड, कमल घोलप, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, उप आयुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, श्रीनिवास दांगट, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील यांनी दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, दिव्यांगांना सर्व प्रकारच्या योजनांची माहिती मिळावी यासाठी स्वतंत्र ॲ​प  तयार करण्यात आले असून या अॅपमध्ये दिव्यांगानी सादर केलेल्या अर्जाबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. या ॲ​पद्वारे मनपा हद्दीतील सर्व दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

महापौर ढोरे यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उपस्थितांसह तसेच शहरातील दिव्यांग व्यक्तींना शुभेच्छा दिल्या. दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महानगरपालिका विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करीत असून या योजनांचा लाभ गरजूंनी घ्यावा असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी यावेळी केले.

शहरातील प्रत्येक घटक सक्षम झाला पाहिजे यासाठी महानगरपालिका कटीबध्द असून दिव्यांग व्यक्तींकरीता जास्तीत जास्त योजना राबविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे असे त्या म्हणाल्या. नागरवस्ती विभागामार्फत दिव्यांगांकरीता तयार करण्यात आलेल्या अॅपचे लोकार्पण यावेळी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पद्मश्री गिरिश प्रभुणे, दीक्षा दिंडे, विविध सामाजिक संस्थांचे दिव्यांग प्रतिनिधी दिव्यांग नागरिक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पद्मश्री गिरिश प्रभुणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, दीक्षा दिंडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले तर समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.