Chinchwad: एक लाख 12 हजार मते देऊन जनतेने मोठा विश्वास टाकला – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून एक लाख 12 हजार 225 इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेने मते दिली. चिंचवडच्या जनतेने माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. त्यामुळे चिंचवडच्या जनतेचे मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रिया पराभवानंतर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे लक्ष्मण जगताप सलग तिस-यांदा विजयी झाले आहेत. 38 हजार 498 मतांनी ते विजयी झाले आहेत. परंतु, मागीलवेळीपेक्षा तब्बल 22 हजारांनी त्यांचे मताधिक्य घटले आहे. शेवटच्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उडी घेऊनही एकतर्फी वाटणा-या निवडणुकीत राहुल कलाटे यांनी घाम फोडला. कलाटे यांनी जगताप यांनी टफ फाईट दिली.

कलाटे यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे की, चिंचवडमधील सर्वांच्या आशीर्वांदाने मला एक लाख 12 हजार 225 इतक्या मोठ्या प्रमाणात मते मिळाली. माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला. प्रत्येक मत माझ्यासाठी प्रेरणादायी असून त्यासाठी मी चिंचवड मतदारसंघात सैदव कार्यरत राहील. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे पाठिंबा दिलेल्या संघटना व इतर सर्व पक्षांचे नगरसेवक पदाधिकारी व हजारो मित्र, कार्यकर्ते यांनी केलेल्या मोलाचे सहकार्य मी विसरु शकत नाही. पाठिंबा दिलेल्या संघटना तसेच सर्वांचे मनापासून आभार मानतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.