Commissioner Rajesh Patil : अण्णाभाऊंच्या परिवर्तनशील विचारांचा अंगीकार करणे हेच त्यांना खरे अभिवादन

एमपीसी न्यूज – साहित्याच्या माध्यमातून उपेक्षितांचा आवाज, वेदना आणि अन्यायाला वाचा फोडून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात नवा मानदंड निर्माण केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या परिवर्तनशील विचारांचा दैनंदिन जीवनात अंगीकार करणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील (Commissioner Rajesh Patil) यांनी केले.  

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळच्या बसस्थानकाशेजारील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारप्रबोधन पर्वाचे उद्घाटन महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, उपआयुक्त रविकिरण घोडके, निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, माजी महापौर उषा ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक किसन नेटके, उत्तम केंदळे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे, संतोष शिंदे, अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे पदाधिकारी संजय ससाणे, मनोज तोरडमल, नितीन घोलप, सुनील भिसे,  अविनाश लांडगे, नवनाथ शेलार, डॉ. धनंजय भिसे, सामाजिक कार्यकर्ते, युवराज दाखले, सतीश भवाळ, स्वप्नील जाधव, संदिप जाधव, मयूर जाधव, अरुण जोगदंड, सागर तापकीर, जीवन बोऱ्हाडे आदींसह शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त पाटील (Commissioner Rajesh Patil) म्हणाले, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांसारख्या थोर व्यक्तींनी मानवाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले. अज्ञान, अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा यामध्ये  गुरफटलेल्या समाजाच्या उत्थानासाठी सर्व महापुरुषांनी कार्य केले. याचाच परिपाक म्हणजे आता बहुजन समाजाचे जीवनमान उंचावले आहे.  महापुरुषांनी शिक्षणाची शिकवण दिली. शिक्षण हे आयुष्यात खूप महत्वाचे असून त्यामुळे माणसाची प्रगती होते. यासाठी साहित्यातून परखड विचार मांडणारे अण्णा भाऊ साठे हे बहुआयामी व्यक्तिमत्व ठरतात. त्यांच्या साहित्य हे समाजप्रबोधनाचे साधन आहे.  महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असून अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य घराघरांत पोहोचावे, यासाठी या प्रबोधन पर्वाचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रबोधन पर्वाचा लाभ घ्यावा.

CM Eknath Shinde: विकासकामांसाठी शासन पाठीशी, जनहिताची कामे थांबणार नाहीत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरम्यान, या विचार प्रबोधन पर्वाची सुरुवात सकाळी पारंपरिक सनई वादनाने झाली. हलगीवादनाच्या  जुगलबंदीने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांनी स्वरचंदन  हा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रमाचा सादर केला. दुपारी 1 वाजता शाहीर बापूराव पवार यांच्या ‘लेखणीचा बादशहा’ या शाहिरीच्या  कार्यक्रमाला उपस्थितांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. दुपारी 2 वाजता विविध बँड पथकांमध्ये ‘बँड स्पर्धा’ रंगल्या. प्रत्येक बँड पथकाने आपली कला उपस्थितांसमोर सादर केली. सायंकाळी 4 वाजता अनिकेत जवळेकर यांचा ‘सुवर्ण लहरी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर योगेश देशमुख यांचा ‘महाराष्ट्राचे लोकरत्न’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रमातून नागरिकांचे मनोरंजनातून प्रबोधन केले. अरुण गायकवाड यांच्या ‘गौरव महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाने विचार प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.