Pimpri News : राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांचा दणका; ‘वायसीएमएच’मधील कंत्राटी कर्मचा-यांना मिळाले थकीत वेतन

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांपासून पगार झाला नसल्याने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या कार्यालयात आज (गुरुवारी) धरणे आंदोलन केले. आंदोलनाच्या दणक्यानंतर प्रशासन अधिकारी दिलीप करंजखेले यांनी तत्काळ कंत्राटदाराला फोन करून पगार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कंत्राटदारानेही तत्काळ कामगारांचा पगार केला. त्यामुळे कामगारांना सणाच्या दिवशी पगार मिळाला आहे.

बीव्हीजी या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीने पंधरा ते सोळा वर्षांपासून वायसीएम रुग्णालयात काम करत आहेत. आता ते काम सुलभ इंटरप्राईजेस कंत्राटदाराला गेले आहे. या कंत्राटदाराच्या माध्यमातून हे कर्मचारी वायसीएम रुग्णालयात काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांची पंधरा वर्षांची ग्रॅज्युटी कोणी द्यायची? फंड कोणी भरायचा? याबाबत प्रशासनाला पत्र दिले. पण त्याची दखल घेतली जात नव्हती. त्याचा खुलासाही केला जात नव्हता.

याशिवाय दुसरा महिना सुरू झाला तरी या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नव्हता. त्याबाबत प्रशासनाशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला. पण त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे या 170 कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेऊन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या कार्यालयात धरणे आंदोलनाला बसले. त्यानंतर प्रशासन अधिकारी दिलीप करंजखेले यांनी कंत्राटदाराला फोन लावला.

दरम्यान, आजच्या आज कर्मचाऱ्यांचा पगार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर कंत्राटदाराने तत्काळ पगार केला. त्यामुळे होळी सणाच्या दिवशी कामगारांना पगार मिळाला. त्यांना सण साजरा करता येईल असे भोसले म्हणाले. समान काम समान वेतन या कायदयानुसार वेतन मिळण्यासाठी लढा सुरू ठेवणार आहे. ग्रॅज्युटीबाबत बैठक घेण्याचे आश्वासन प्रशासन अधिकारी करंजखेले यांनी दिली. त्यामुळे धरणे आंदोलन मागे घेतल्याचे भोसले यांनी सांगितले.

संघटनेचे समन्वयक शशांक इनामदार, कामगार नेते संतोष टाकले, कृष्णा शिकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.