India Corona Update : कोरोनाचा उद्रेक ! 24 तासांत जवळपास तीन लाख रुग्णांची नोंद

दोन हजार मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाचा कहर सुरू आहे. गेल्या 24 तासांत देशभरात जवळपास तीन लाख कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, ही आजवरची उच्चांकी रुग्णवाढ आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली असून, ती एकवीस लाखांच्या पुढे गेली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 95 हजार 041 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 56 लाख 16 हजार 130 एवढी झाली आहे. त्यांपैकी 1 कोटी 32 लाख 76 हजार 039 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 1 लाख 67 हजार 457 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

चिंताजनक बाब म्हणजे देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, सध्या 21 लाख 57 हजार 538 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 2 हजार 023 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 82 हजार 553 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.16 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 85.01 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 27 कोटी 10 लाख 53 हजार 392 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 16 लाख 39 हजार 357 चाचण्या बुधवारी (दि.20) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 13 कोटी 01 लाख 19 हजार 310 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. एक मे पासून अठरा वर्षांवरील सर्वजण लस घेण्यासाठी पात्र असतील. केंद्र सरकारने याबाबत तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला परवानगी देत हा निर्णय दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.