Corona Vaccination : बुस्टर डोस कधी घेणार विचार करताय? वाचा….

एमपीसी न्यूज – देशात पुन्हा एकदा कोरोना संकट घोंगावायला लागले आहे. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरीयंट थैमान घालण्याआधीच त्याला रोखण्यासाठी आणि खबरदारी म्हणून कोरोनाचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस मधील अंतर कमी करण्याचा निर्णय केंद्र लवकरच घेईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

या निर्णयासाठी लसीकरणावर काम करणारा राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट म्हणजेच NTAGI याबाबत शिफारस करणार असून यासबंधी 29 एप्रिल रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

ICMR ने केलेल्या तपासणीत सहा महिन्यांनंतर अँटीबॉडीजची कमी झालेली पातळी आणि बुस्टर डोस दिल्याने वाढत असलेली रोगप्रतिकार क्षमता याबाबतची निरीक्षणे या निर्णयामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे बुस्टर डोस नागरिकांनी लवकर उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सुद्धा कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावर रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून मास्क वापरणे गरजेचे आहे. लस घेणे अपरिहार्य आहे.

रुग्णांमध्ये फ्लुसदृष्य लक्षणे आढळल्यास तात्काळ आरटीपीसीआर चाचणी करा, लसीकरणाचा वेग वाढवा अशी सूचना सुद्धा त्यांनी यावेळी दिल्या. शिवाय लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बुस्टर डोस लवकर मिळण्यासाठी यातील अंतर कमी करण्याबाबत आणि सक्तीचे लसीकरण करण्याबाबत केंद्र सरकारकडे लवकरच पत्र पाठवणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.