Dehuroad : भाजप नगरसेवकावर हल्ल्याच्या निषेधार्थ देहूरोडमध्ये मूक मोर्चा

परिसरातील नागरिकांमध्ये घबराहट; व्यापा-यांनी दुकाने बंद ठेऊन पाळला संप

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार झाला. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड येथे घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज (शुक्रवारी) देहूरोडमधील नागरिकांनी मूक मोर्चा काढला. तसेच व्यापा-यांनी दुकाने बंद ठेऊन संप पाळला.

विशाल उर्फ जिंकी सुभाषचंद्र खंडेलवाल हे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक आहेत. विकासनगर देहूरोड येथे खंडेलवाल यांचे कार्यालय आहे. गुरुवारी सायंकाळी ते कार्यालयात आले. कार्यालयातील कामकाज आटोपून सायंकाळी साडेसातच्या सुमारास कार्यालयाच्या बाहेर त्यांचा चालक महंमद शेख व रमजान यांच्याशी उद्याच्या कार्यक्रमाची चर्चा करत होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन हल्लेखोर आले. त्यातील एकाने दुचाकीवरून खाली उतरून खंडेलवाल यांना शिवीगाळ करून त्यांच्या दिशेने गोळीबार केला.

  • खंडेलवाल मागे सरकल्यामुळे त्यांना गोळी लागली नाही. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खंडेलवाल ओरडत पळत असताना पाय-यांवर पडले. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायाला मार लागला. दरम्यान, घटना घडल्यानंतर खंडेलवाल यांच्या ओळखीचे राजेश खंडेलवाल आरोपींच्या दिशेने पळाले असता आरोपींनी राजेश यांना पिस्तुलाचा धाक दाखवून दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून पळून गेले.

या घटनेच्या निषेधार्थ देहूरोड मधील नागरिकांनी आज देहूरोडमधून मूक मोर्चा काढला. या मोर्चामध्ये कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. तसेच देहूरोडमधील व्यापा-यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत दुकाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला. देहूरोडमधील नागरिक या घटनेमुळे भयभीत झाले आहेत.

  • भरगर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. घटना घडून एक दिवसाचा कालावधी उलटला तरी आरोपी मोकाट आहेत. यामुळे देहूरोडमधील नागरिक भीतीचे वातावरणात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.