Nigdi Crime News : क्लबमध्ये नाचणाऱ्या महिलांवर पैसे उधळण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी

एमपीसी न्यूज – दारू प्यायला तसेच क्लबमध्ये नाचणा-या महिलांवर पैसे उधळण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी केली. तसेच लग्नात मागणी केलेली मर्सिडीज गाडी देण्याचीही मागणी केली. सास-याने विवाहितेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती, सासरे, सासू, नणंद, नणंदेचा पती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 21 एप्रिल 2014 ते 10 मार्च 2021 या कालावधीत प्राधिकरण निगडी आणि कृष्णानगर चिखली येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आणि सासरे यांना दारू पिणे, क्लबमध्ये बायकांवर पैसे उधळणे असे नाद आहेत. त्या कारणासाठी पती आणि सास-याने विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. लग्नामध्ये मर्सिडीज गाडीची मागणी केली होती, ती गाडी आणावी म्हणत विवाहितेची स्त्रीधन घेऊन तिला परत दिले नाही.

आरोपी सास-याने विवाहितेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. विवाहितेला मुलगी झाल्याने सासू, नणंद यांनी ‘तू अपशकुनी आहेस’ अशी दूषणे दिली. तसेच सर्व आरोपींनी विवाहितेला क्रूरतेची वागणूक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.