Double Murder Case: गूढ उकलले; दागिन्याच्या हव्यासापोटी चुलत भावानेच केली बहीण-भावाची हत्या

Double Murder Case: Mystery solved; brother and sister killed by cousin out of desire for jewelery काका-काकू घरात नसल्याची संधी साधून सतीशने आपल्या भावजीच्या साथीने आपल्याच चुलत भावंडांचा खून करून हे दागिने पळवले होते

एमपीसी न्यूज- दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात सख्ख्या बहीण-भावांच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले आहे. मृतांचा चुलत भाऊ आणि त्याच्या भावजीने सौरभ (वय 17) व किरण (वय 19) या बहीण-भावाचे गळे कापून त्यांच्या घरातील सुमारे १ किलो सोने लंपास केले होते. मोबाइल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना गंगापूरहून अटक केली.

सतीश काळूराम खंदाडे (20, रा. पाचन वडगाव, जि. जालना) आणि अर्जुन देवचंद राजपूत (25, रा. रोटेगाव, ता. वैजापूर) अशी आरोपींची नावे आहेत.

सौरभची आई अनिता खंदाडे-राजपूत यांनी दिवाळीला घरातील सोने एका ताटात ठेवून त्याचे पूजन केले होते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हॉट‌्सऍप स्टेटसलाही ठेवले होते. आरोपी सतीशने काकूचे ते स्टेट‌स बघितले आणि तेव्हापासूनच त्याचा या सोन्यावर डोळा होता.

काका-काकू घरात नसल्याची संधी साधून सतीशने आपल्या भावजीच्या साथीने आपल्याच चुलत भावंडांचा खून करून हे दागिने पळवले होते, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. आरोपी सतीशचा भावजी अर्जुन राजपूत हा लॉकडाऊनपासून सासुरवाडीत म्हणजे पाचन वडगावला राहत होता.

सतीश हा शेतीकाम करतो तर अर्जुन हा बांधकामावर सेंट्रिंगचे कामे करायचा. मात्र, सध्या कामे बंद असल्याने अर्जुनही बेकार होता.

सौरभ व किरण खंदाडे या बहीण-भावांचा 9 जूनला खून झाला होता. घटना घडली तेव्हा घरात कुणीच नव्हते. रात्री आई, मोठी बहीण गावाहून परतल्यावर हा प्रकार समोर आला. दरम्यान, घरातील सोने गायब होते. कुठेही तोडफोड नव्हती. चहा प्यायलेले चार कप टीपॉयवर होते. तसेच कॅरम बोर्डदेखील बाहेरच असल्याने ओळखीच्या व्यक्तीनेच घात केला असावा, असा संशय पोलिसांना होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.