Chikhali News : चिखली येथे 25 एकर मध्ये होणार अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विस्तार

माजी आमदार विलास लांडे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास चिखली येथे विस्तार केंद्र स्थापन करण्यास 11.30 हेक्टर (सुमारे 25 एकर) शासकीय जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार होते. त्यामुळे शहराच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी भर पडणार असुन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार असल्याची माहिती माजी आमदार विलास लांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी आमदार लांडे यांनी आभार देखील मानले.

प्रसिद्धीपत्रकात माजी आमदार विलास लांडे यांनी नमुद केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकास कामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कधीही आखडता हात घेत नाहीत. शहरात त्यांनी अनेक प्रकल्प आणले आहेत. त्यावरून हे अधिकच स्पष्ट होते.

त्याचाच एक भाग म्हणजे पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विस्तारास चिखली येथे साडे अकरा हेक्टर जमिन देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार लांडे यांनी दिली. त्याबाबत लवकरच कार्यवाही होणार असल्याचेही माजी आमदार लांडे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडची ओळख औद्योगिक नगरी आहे. त्याच बरोबर या शहरात अनेक मोठ्या नामांकित शिक्षण संस्था आल्याने शैक्षणिक हब देखील हे शहर बनत आहे. त्या मध्ये चिखली येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊन आणखी भर पडणार आहे. हे महाविद्यालय सुरू झाल्यास शहरातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त होणार आहे.

शिक्षणासाठी पुणे शहरात विद्यार्थ्यांचा होणारा हेलपाटाही वाचणार आहेत. या बरोबरच बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थीही शिक्षणासाठी पुणे बरोबर पिंपरी चिंचवडला प्राधान्य देतील. त्यामुळे हा निर्णय घेतल्याबद्दल  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी आमदार विलास लांडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.