Pune News : खवले मांजराची तस्करी करणारे चार जण अटकेत

एमपीसी न्यूज : अंधश्रद्धेपोटी बाळगल्या जाणाऱ्या खवले मांजराची तस्करी प्रकरणात वनविभागाच्या पुणे कार्यालयातील पथकाने जुन्नर आणि संगमनेर परिसरातून ४ जणांना अटक केली आहे.

महेंद्र मच्ंिछद्र केदार (वय २५), सागर भीमाजी डोके (वय २५, दोघे रा. साकुर, ता.संगमनेर, जि. अहमदनगर), अशोक दादा वारे (वय २९,रा. तहराबाद, ता. राहुरी, जि. अहमदनगर), अनिला धोंडिबा भालेकर (वय ६१,रा. विठ्ठलवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

खवले मांजराच्या विक्रीवर बंदी आहे. अंधश्रद्धेपोटी गेल्या काही वर्षांत खवले मांजर बाळगले जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परदेशात तस्करी करून खवले मांजर विक्रीस पाठविले जाते. पुणे-नाशिक रस्त्यावर असलेल्या संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात खवले मांजराची विक्री करण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती वनविभागाच्या पुणे कार्यालयातील उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना मिळाली.

त्यानंतर वनविभागाच्या पथकाने तेथे सापळा लावून केदार, डोके, वारे यांना ताब्यात घेतले. चौकशीत भालेकर यांचा खवले मांजर विक्री व्यवहारात सामील असल्याची माहिती मिळाली. भालेकर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली असून शिवाजीनगर न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत वनविभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.