Alandi News : मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग आणि पोलिसांना मारहाण

चौघांवर गुन्हा, एकाला अटक

एमपीसी न्यूज – मैत्रिणीला तिच्या कामाच्या ठिकाणी भेटण्यासाठी गेलेल्या तरुणीसोबत एका तरुणाने अश्लील चाळे केले. त्यानंतर अन्य तीन जण आले. त्यांनी देखील तरुणी सोबत गैरवर्तन करत तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने तिच्या मौत्रिणीच्या मदतीने पोलिसांना बोलावले असता आरोपींनी पोलिसांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना रविवारी (दि. 14) दुपारी साडेचार वाजता आळंदी मधील चाकण चौकात घडली. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

ज्ञानेश्वर अश्रूबा देवकाते (रा. इंद्रायणी नगर, देहूफाटा), राहुल दौंडकर (रा. शेलपिंपळगाव, ता. खेड), विष्णू नरवडे (रा. मरकळ रोड, आळंदी), संतोष गेनू तापकीर (रा. च-होली बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा केल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिडीत तरुणीने विनयभंगाची फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पीडित तरुणीची मैत्रीण चाकण चौक आळंदी येथे एका ट्रॅव्हल्स बुकिंग ऑफिसमध्ये काम करते. पीडित तरुणी रविवारी दुपारी तिला भेटण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये गेली होती. काही कामा निमित्त फिर्यादी यांना ऑफिसमध्ये बसवून मैत्रीण बाहेर गेली. त्यावेळी आरोपी ज्ञानेश्वर तिथे आला. ‘तू मला खूप आवडतेस. मी तुला प्रपोज करणार आहे’ असे म्हणून ज्ञानेश्वर याने तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला आणि निघून गेला.

त्यानंतर अन्य तीन आरोपी फिर्यादी बसलेल्या बुकिंग ऑफिसमध्ये आले. ज्ञानेश्वर याने जे अश्लील वर्तन केले, तेच अश्लील वर्तन आम्हालाही करू दे, असे म्हणत तिन्ही आरोपी तरुणीच्या अंगाशी झटापट करू लागले. तरुणीने आरडाओरडा केल्यामुळे आरोपी ऑफिसमधून पळून गेले. तरुणीने तिच्या मैत्रिणीला बोलावून घेतले आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांना बोलावून घेतले. गैरवर्तन करणारी मुले आसपास दिसतात का अशी चौकशी करत असताना ज्ञानेश्वर जवळच काही अंतरावर थांबला असल्याचे पीडित तरुणीने सांगितले. पोलिसांनी पाठलाग करून ज्ञानेश्वर याला ताब्यात घेतले.

आरोपी ज्ञानेश्वर याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जात असताना ज्ञानेश्वर आणि त्याच्या तीन साथीदारांनी पोलिसांना बेदम मारहाण केली. शिवीगाळ आणि दमदाटी करत ‘तुम्ही पोलीस आमचे काही वाकड करू शकत नाही’ असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर आरोपी राहुल, विष्णू आणि संतोष त्यांच्याकडील दोन दुचाकीवरून पळून गेले. पोलिसांनी ज्ञानेश्वर याला अटक केली आहे. पोलीस शिपाई अंकुश राठोड यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची फिर्याद दिली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.