Ravet Crime : तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक; बळजबरीने दोन्ही फ्लॅटचा ताबा, ‘बेघर’ बांधकाम व्यवसायिक महिलेची पोलीस आयुक्तांकडे धाव

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यवसायिक महिलेची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक करण्याबरोबर तिच्या दोन्ही फ्लॅटचा बळजबरीने ताबा घेऊन तिला बेघर करण्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली असून या व्यवहारात होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून अखेर संबंधित व्यवसायिक महिलेने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे शनिवारी (दि.27) लेखी तक्रार दिली आहे.

रावेत येथील एका बांधकाम व्यावसायिक महिलेने परमेश्वर उर्फ प्रमोद सूर्यवंशी, निखील सिंग, मिथुन यादव यांच्या विरोधात ही तक्रार केली आहे. या महिलेच्या तक्रारीची पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश रावेत पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,आपली जानेवारी 2022 मध्ये वाकड येथील प्लॉटवरील बांधकाम प्रकल्पाच्या संदर्भात सूर्यवंशी याच्याशी ओळख झाली.या प्लॉटवर दोघांनी मिळून काम करण्याचे ठरले.मात्र, ते काम होऊ शकले नाही.त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी एकत्र काम करू म्हणत सूर्यवंशी याने त्यासाठी 25 कोटी लागतील.ते आपण रॉयल डिमांड इनव्हेस्टमेंट प्रा. लि., मुंबई या कंपनीकडून घेऊ.त्यासाठी आपल्या बँक खात्यावर किमान साडेतीन कोटी तरी दाखवावे लागतील. यासाठी विघ्नहर्ता फायनान्स यांच्याकडून 3 कोटी कर्ज घेतल्याचे दाखविण्याचा डाव रचला.त्यासाठी आपले 3 वर्षाचे प्रोफाईल वापरले.प्रोजेक्ट रिपोर्टसाठी 50 हजार रुपये घेतले.या साऱ्या गडबडीत एक महिना निघून गेला असता आणखी 50 लाख खात्यात जमा करावे लागतील, असे सूर्यवंशी याने सांगितले.

पीडित महिलेने नातेवाईक व मित्र परिवाराकडून 50 लाख जमा केले.महिनाभरात काम होईल, असे सांगत एप्रिल 2022 पर्यंत वेगवेगळी कारणे देत तारीख पुढे ढकलली या काळात त्या महिलेकडून वेळोवेळी पैसे घेण्यात आले.त्यानंतर 20 एप्रिल रोजी अचानक सूर्यवंशी याने सांगितले, की वामनराव साहेबराव जोगदंड या माणसाने खात्यातील साडेतीन कोटी परस्पर काढून घेतले.या विरोधात तक्रार करण्यापासून सूर्यवंशी याने विविध सबबी देत त्या महिलेला अडविले.दुसऱ्या फायनान्स कंपनीकडून पैसे घेऊ अशी केवळ आशा दाखवली.

दरम्यान, पीडित महिलेची ओळख निखील सिंग याच्याशी झाली. त्यांनी एकत्र व्यवसाय करण्याचे ठरविले.नवलाख उंब्रे येथील एका प्लॉटवर काम करण्याचे ठरले.त्यासाठी त्यांना सिंग याने 40 लाख रुपये दिले.या बदल्यात एक महिन्यात सिंग यांना 75 लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र, सूर्यवंशी यांने केलेल्या फसवणुकीमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने त्यांचा तो व्यवहारही झाला नाही.

त्यातच सिंग याने पैशांसाठी तगादा लावला. त्यानंतर सिंग व त्याचा सोबती मिथुन यादव यांनी त्या महिलेला धमकविण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेश येथे राजकीय ओळखी असून कुटुंबीयांसह तुझे बरे-वाईट करू अशा धमक्या दिल्या.दरम्यानच्या काळात वसुलीपोटी त्या महिलेचे आकुर्डी व रावेत येथील घर बळजबरी नावावर करून घेतले.तसेच, तळेगाव येथील जागेची कागदपत्रे बळजबरीने घेतली.कागदपत्रांची मागणी केली असता 10 लाख किंवा 5 लाख तरी द्या अशी पैशांची मागणी केली.

सिंग व त्याच्या साथीदाराने पीडित महिला व त्यांचे वयस्कर सासू-सासरे व मुलगी यांना फक्त अंगावरील कपड्यावर घराबाहेर काढले.वेळोवेळी भेटून मानसिक त्रास देत आहे, असे तक्रार अर्जात म्हटले आहे.

या सगळ्या फसवणुकीमध्ये घरी किंवा बँक खात्यात एकही पैसा शिल्लक नसून जीव देण्यापलीकडे कोणताही मार्ग राहिला नसून आपल्या तसेच आपल्या कुटुंबातील कोणाच्याही जिवाचे काही बरे-वाईट झाले तर त्यासाठी प्रमोद सूर्यवंशी, निखील सिंग व मिथुन यादव हे सर्वस्वी जबाबदार असतील,असे पीडित महिलेने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

प्रॉपर्टी माफियांवर ‘मोका’ अंतर्गत कारवाईची मागणी 

व्यावसायिक लोकांना आर्थिक अडचणीत पकडून त्यांच्या मालमत्ता हडपणारी टोळी पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत असून त्या टोळीविरुद्ध संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायदा म्हणजेच मोका अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.पीडित महिलेच्या तक्रारीनुसार फिर्याद दाखल करून पोलिसांनी आरोपींवर त्वरित कारवाई करावी,अन्यथा पीडित कुटुंबासह पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नाईक यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.