GT vs RR : गुजरात टायटनने राजस्थान रॉयल्सला सात गडी राखून दणदणीत मात देताना विजेतेपदाकडे टाकले आणखी एक दमदार पाऊल

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : हार्दिक पंड्याने या आयपीएल स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वानाच प्रभावीत करताना फलंदाजी आणि गोलंदाजीतही दमदार कामगिरी करत आपल्या संघाला साखळी स्पर्धेत सर्वोच्च स्थान मिळवून दिले होते. आज त्यावर कळस चढवताना त्याने डेविड मिलर सोबत 64 चेंडूत 106 धावांची अभेद्य नाबाद भागीदारी करताना आपल्या संघाला 7 गडी आणि तीन चेंडू राखून दणदणीत विजय मिळवून देताना अंतीम सामन्याचे तिकीटही मिळवून दिले आहे.

राजस्थान रॉयल्सने दिलेले 189 धावांचे मोठे आव्हान हार्दिक आणि कंपनीने सहज साध्य करत आपल्या पदार्पणातच अंतीम फेरीत प्रवेश करत अविस्मरणीय कामगिरी केली आहे,डेविड मिलरने जबरदस्त फलंदाजी करत एकहाती सामना जिंकून दिला असे म्हटले तर त्यात फारसे वावगे असणार नाही.आणि त्यालाच सामन्याचा मानकरी म्हणून गौरवण्यात आले.

बहुप्रतिक्षितत आयपीएल  चा 15 वा सीझन सुरू झाला आणि बघताबघता आता हा अंतीम टप्प्याकडेही आला आहे,साखळी फेरीचे तब्बल 70 सामने झाले. 1000 हुन अधिक षटकार, चौकार मारले गेले. अनेक विकेट्स पडल्या, मोठमोठे बक्षिसेही वाटप झाली, मोठमोठ्या आणि दमदार संघाला अनपेक्षित धक्के बसले,बाहेरची वाट धरावी लागली आणि राजस्थान रॉयल्स (2008 चे विजेते) सोडली तर तीन नवे संघ अंतीम चार मध्ये आणि विजेतेपदासाठी लढणार आहेत.

यातल्या पहिल्या कॉलीफायरचा सामना या स्पर्धेत पहिल्यांदाच उतरूनही आपला डंका वाजवणाऱ्या गुजरात टायटन विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघात आज पहिल्यांदाच कोलकाताच्या जगप्रसिद्ध ईडन गार्डन मैदानावर खेळवला गेला. ज्यात गुजरात टायटनने राजस्थान रॉयल्सला दणदणीत मात देत अंतीम सामन्यात दिमाखात प्रवेश केला आहे.

या हंगामातले आतापर्यंतचे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथे खेळवले गेले. पण आता अंतीम टप्प्यातले सामने कोलकाता आणि अहमदाबाद येथे खेळवले जाणार आहेत.

आजच्या या महत्वपूर्ण सामन्यात गुजरात टायटनचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत राजस्थान रॉयल्सला फलंदाजीसाठी पाचारण केले. ऑरेंज कॅपचा  मानकरी (आतापर्यंत तरी) असलेला जॉस बटलर आणि युवा यशस्वी जैस्वाल या जोडीने राजस्थान रॉयल्सच्या डावाची सुरुवात केली खरी, पण जैस्वाल आज तरी यशस्वी ठरला नाही आणि केवळ 8 चेंडूत 3 धावा करुन यश दयालच्या गोलंदाजीवर बाद होवून तंबुत परतला. यावेळी राजस्थान संघाच्या नावापुढे फक्त 11 धावा लागल्या होत्या. यानंतर मात्र बटलर आणि कर्णधार संजू सॅमसनने जबरदस्त खेळत डावाला चांगलेच सावरले.

बघताबघता या जोडीने अर्धशतकी भागीदारी पूर्ण करत आलेले दडपण सहज झुगारून लावले, खास करुन संजू,त्याला योग्यवेळी आपला फॉर्म गवसला आणि त्याने टीपीकल संजूगिरी दाखवत गुजरात टायटनच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. त्याला बटलरही दुसऱ्या बाजूने योग्य साथ देत होता. मात्र नवोदित साईकिशोरने अर्धंशतकाजवळ आलेल्या संजूला 47 धावावर बाद करुन ही जोडी फोडली आणि आपल्या संघाला मोठे यश मिळवून दिले.

संजूने 27 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत 47 धावा करताना बटलरसोबत दुसऱ्या गड्यासाठी 47 चेंडूत 68 धावांची चांगली भागीदारीही केली. त्याच्या जागी आला तो देवदत्त पडीकल. ज्याला या स्पर्धेत अजुनतरी त्याच्या किर्तीला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आज तरी त्यात बदल होईल अशी आशा राजस्थान रॉयल्सचे समर्थक करत होते. त्यातच पडीकलने चांगली सुरुवात केली खरी, पण 20 चेंडूत 28 धावा करुन तो हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने बटलर सोबत 37 धावांची भागीदारीही जोडली.

एका बाजूने अशा विकेट्स पडत असल्या तरी बटलरची बॅट  आज मात्र काही दिवसांच्या मौनानंतर  बोलायला लागली होती. आज त्याने आपले आणखी एक(वैयक्तिक 15 वे)अर्धशतक पूर्ण करुन मोठ्या आणि महत्वाच्या सामन्यातला खेळाडू असल्याचे सिद्ध केले.त्याच्या उपयुक्त फटकेबाजीमुळेच राजस्थान रॉयल्सने आपल्या निर्धारित 20 षटकात 5  गडी गमावून धावा करत गुजरात टायटन पुढे चांगलेच आव्हान उभे करण्यात यश मिळवले.बटलर डावाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला.त्याने 56 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकार मारत 89 बहुमूल्य धावा करुन आपल्या संघाला मोठी धावसंख्या गाठून देण्यात मोठा वाटा उचलला.

उत्तरादाखल खेळताना आणि अंतीम सामन्यात प्रवेश करण्यासाठी गुजरात टायटन संघाला 20 षटकात 189 धावांचे विशाल लक्ष्य पार करायचे होते. त्यासाठी त्यांना हवी होती मजबूत सुरुवात आणि ती जबाबदारी होती युवा गील आणि अनुभवी वृद्धीमान साहाच्या खांद्यावर. पण राजस्थानच्या अनुभवी ट्रेंट बोल्टने गुजरात टायटनच्या डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर एका अप्रतिम इनस्विंगवर साहाला चकवले आणि चेंडू कधी त्याच्या बॅटची कड चाटून संजूच्या हातात विसावला हे त्याला कळालेही नाही.

बोल्टने आपल्या संघाला मोठे यश मिळवून देताना गुजरात टायटनलका मोठा धक्काही दिला. मात्र या धक्क्याने जराही विचलित न होता गील आणि मॅथ्यू वेडने पुढे खेळताना 46 चेंडूत 72 धावांची चांगली आणि वेगवान भागीदारी करत डाव सावरला. गील आणि वेड दोघेही भन्नाट खेळत होते. गीलला एक दोन जीवदानही मिळाले. मात्र त्याला त्याचा फारसा फायदा उठवता आला नाही आणि तो 35 धावा करुन एक चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला आणि गुजरात संघाला दुसरा मोठा धक्का बसला.

त्याच्या जागी आला तो कर्णधार हार्दिक पंड्या.त्याच्या सोबत खेळताना वेडने संघाच्या धावसंख्येत आणखी तेरा धावा जोडल्या असतानाच वेडही 35 धावा करून मॅकॉयच्या गोलंदाजीवर बटलरने घेतलेल्या अप्रतिम झेलामुळे  बाद झाला,आणि गुजरात संघ चांगलाच अडचणीत आला. यावेळी गुजरात टायटनची धावसंख्या  9.3 षटकात 3 बाद 85 अशी होती.

यावेळी विजयासाठी गुजरात संघाला 63 चेंडूत 104 धावांची गरज होती आणि मैदानावर होते कर्णधार पंड्या आणि डेविड मिलर. या जोडीने कसलेही दडपण न घेता प्रतिकार सुरु ठेवत केवळ 35 चेंडूत 53 धावांची नाबाद अर्धशतकी भागीदारी करुन आम्ही या आव्हानासाठी तयार आहोत असाच जणू  संदेश दिला. आणि हीच गुजरात संघाची खासियत या स्पर्धेत सातत्याने दिसत आलेली आहे.

आपल्या 14 सामन्यात दहा विजय मिळवणाऱ्या गुजरात ने सात पैकी सहा विजय चेस करताना मिळवलेले आहेत. पंड्या आणि मिलर ही जोडी आक्रमक आणि खतरनाकही. कितीही मोठे आव्हान यांना जम बसल्यावर किरकोळ ठरवण्याची कला अवगत आहे. त्याचीच प्रचीती ते आज पुन्हा दाखवणार का याची प्रतीक्षा अगणित क्रिकेटवेड्या रसिकांना होतीच. अखेरच्या चार षटकात गुजरात टायटनला विजयासाठी 43 धावा हव्या होत्या आणि त्यांचे 7 गडी शाबूत होते, त्यामुळे गुजरात संघ फायनलचे तिकीट नक्कीच मिळवणार असे वाटत होते.

17व्या षटकात मकॉयने 9 धावा देत गुजरातपुढे 18 चेंडूत 34 धावाचे आव्हान ठेवले. 18 वे षटक घेऊन आला यजुर्वेद चहल. पहिल्या चार चेंडूत चार धावा दिल्यानंतर मिलरने 5 व्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारत आलेले दडपण दूर केले. या षटकात 11 धावा आल्या,आता 12 चेंडूत  हव्या होत्या 23 धावा.दोन्ही फलंदाज जबरदस्त खेळत होते. दरम्यान मिलरने आपले 12 वे आयपीएल अर्धशतक केवळ 35 चेंडूत पूर्ण करत विजयाकडे दमदार वाटचाल सुरुच ठेवली.

मकॉयने 19 व्या षटकात सुंदर आणि किफायतशीर गोलंदाजी केली आणि केवळ 7 धावा दिल्याने गुजरात संघाला शेवटच्या सहा चेंडूत 16 धावा हव्या होत्या. त्या रोखायची जबाबदारी होती प्रसिद्ध कृष्णावर. पण मिलरने त्याच्या पहिल्याच चेंडूवर 96 मीटरचा उत्तुंग षटकार मारत कृष्णावरचे  दडपण आणखीनच वाढवले. डेविड मिलरला किलर मिलर का म्हणतात हे सिद्ध करणारी त्याची आजची पारी होती. कृष्णावर आलेले दडपण त्याला काही केल्या झुगारून देता आले नाही आणि त्याच्या दुसऱ्या चेंडूवरही मिलरने षटकार मारत 63 चेंडूत 100 धावांची वेगवान भागीदारीही पूर्ण केली.

या धडाक्याने कृष्णा पूर्णपणे गांगरून गेला आणि त्याच दडपणात त्याच्या तिसऱ्या चेंडूवरही मिलरने सलग तिसरा षटकार मारत संघाला 7 गडी आणि 3 चेंडू राखुन दणदणीत विजय मिळवून तर दिलाच. पण या विजयाने अंतीम फेरीत दिमाखात प्रवेश करून आपले आयपीएल पदार्पण अतिशय संस्मरणीय केले आहे. डेविड मिलरने एक जबरदस्त खेळी करताना संघाला विजय मिळवून देताना केवळ 38 चेंडूत नाबाद 68 धावा ठोकल्या ज्यात 5 षटकार आणि तीन चौकार सामील होते, त्याला कर्णधार पंड्याने नाबाद 40 धावा करत चांगली साथ दिली.

राजस्थानचा पराभव झाला असला तरी  त्यांनी अंकतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला असल्याने त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे,आता त्यांची लढत लखनऊ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर लढतीतल्या विजेत्या संघाबरोबर लढत होईल.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स

20 षटकात 6 बाद 188
संजू 47,पडीकल 28,बटलर 89
दयाल 46/1,पंड्या 14/1,साई किशोर 43/1,शमी 43/1
पराभूत विरुद्ध

गुजरात टायटन

19.3  षटकात 3 बाद 189
पंड्या नाबाद  40,मिलर नाबाद 68
गील 35,वेड 35
बोल्ट 38/1,मकॉय 40/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.