India England Cricket : हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगीरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या टी-20 त मिळवला दणदणीत विजय

एमपीसी न्यूज  (विवेक कुलकर्णी)  –  नुकत्याच झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात हातातोंडाशी आलेल्या विजयाला मुकलेल्या भारतीय संघाने तो पराभव विसरून आणि पचवून तीन सामन्याच्या मालिकेतला पहिल्या टी-20 सामन्यात यजमान इंग्लड संघाला 50 धावांनी दणदणीत पराभूत करत विजयी सलामी दिली आहे. अष्टपैलू हार्दीक पंड्याच्या (India England Cricket) कामगीरीने या विजयात मोठा वाटा उचलला आहे.

नियमित कर्णधार रोहीत शर्माने कोरोनाच्या आजारानंतर पुनरागमन करताना गुरुवारी साऊदाम्पटन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि आपल्या निर्धारित 20 षटकात तब्बल 198 धावा ठोकून त्या निर्णयाला सार्थ ही ठरवले. त्यानंतर बलाढ्य इंग्लंड संघाला केवळ 148 धावांत रोखून 50 धावांनी मोठा विजयही मिळवला.

खरेतर भारतीय संघाची सुरूवात काहीशी अडखळतच झाली. रोहीतने ईशान किशन सोबत सलामीला येत 14 चेंडूत 24 धावांची आक्रमक सुरुवातही केली, रोहीतच्या 24 धावांमध्ये 5 देखणे चौकार होते, त्याचे असे भरात दिसणे याहून मोठी आनंदी बातमी भारतीय संघासाठी दुसरी कुठलीही असू शकत नाही. तो चांगला खेळत आहे असे म्हणेपर्यंत (India England Cricket) तो मोईनच्या फिरकीवर चकला आणि त्याचा झेल जॉस बटलरने सुंदररित्या घेतला, त्याच्या जागेवर आलेल्या दीपक हुडाने मोईन अलीलाच दोन सलग षटकार मारत रोहीतच्या विकेटने आलेले दडपण झुगारून लावले.

Pavana Dam: पवना धरण परिसरात 24 तासात 76 मिली मीटर पाऊस

हुडाने नुकताच आयर्लंड दौरा चांगलाच गाजवला होता, तोच फॉर्म तो इथेही घेवून आलाय असे वाटत होते. मात्र दुसऱ्या बाजूने ईशान किशनला आज मात्र धावांसाठी झगडावे लागत होते, अखेर त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने आक्रमक अंदाजात मारलेला फटका चुकला आणि मोईनच्याच गोलंदाजीवर तो पार्किन्सन्सच्या हातात झेल देवून बाद झाला.  ईशानने फक्त 8 धावा केल्या. यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 2 बाद 46 अशी होती, यानंतर आलेल्या सुर्यकुमार यादवने मात्र सुर्यासारखे तळपत अप्रतिम फटकेबाजी करत इंग्लड संघाच्या गोलंदाजीवर प्रतिआक्रमण करत डाव सावरायला सुरुवात केली. त्याला दुसऱ्या बाजूने (India England Cricket) दीपक हुडाही चांगली साथ देत होता, ही जोडी जमलीय असे वाटत होते कारण या जोडीने केवळ 23 चेंडूतच 43 धावांची वेगवान भागीदारी जोडली होती. सगळं काही छान चाललेय असे वाटत असतानाच  दीपक हुडा 33 धावा करुन ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला. या विकेट बरोबर जॉर्डन इंग्लंडचा टी – 20 मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने आदिल रशीदच्या 80 बळीच्या विक्रमाला मागे टाकले.

यानंतर थोड्याच वेळात सुर्यकुमार यादवही चांगले खेळत असताना 39 धावा करुन जोर्डनच्याच गोलंदाजीवर बाद झाला. त्याने  केवळ 19 चेंडूतच 39 धावा करताना चार चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्या बाद होण्यानंतर भारतीय संघाने दिनेश कार्तिक ऐवजी अक्षर पटेलला फलंदाजीसाठीं पाठवून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. अर्थात अक्षरने हार्दिक पंड्याबरोबर 45 धावांची भागीदारी करुन आपल्याला कार्तिक ऐवजी पुढे का पाठवले याचे उत्तरही दिले.  अक्षर फटकेबाजी करण्याच्या नादात आपली विकेट पार्किन्सनला देऊन बाद झाला.  दुसऱ्या बाजूने हार्दीक पंड्या अप्रतिम खेळत होता,  त्याची टायमिंगही उत्तम आणि देखणी होत होती, बघताबघता त्याने आपले पहीले टी  – 20मधले अर्धशतकही पुर्ण केले.

यावेळी भारतीय संघ किमान 210 धावा सहज करेल असे वाटत होते,मात्र अर्धशतक झाल्यानंतर तो लगेचच ट्रॉपीलच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि इंग्लिश गोलंदाज अचानक भेदक वाटू लागले,त्यात हर्षल पटेलला धावा काढण्यात अडचण येऊ लागली तरीही दिनेश कार्तिकने फटकेबाजी करत संघाला 198 धावांची (India England Cricket) मजल मारून दिली, खरेतर भारतीय संघाला चांगल्या स्थितीत असतानाही मोठी धावसंख्या रचण्यात अपयश आले ते इंग्लंड संघाने केलेल्या अखेरच्या काही षटकात केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे. तरीही हार्दिक पंड्याच्या फलंदाजीमुळे भारतीय संघ ही सन्मानजनक धावसंख्या उभारू शकला,त्याला हुडा आणि सुर्यकुमार ची साथ ही चांगली मिळाली. इंग्लंड कडून जोर्डन आणि मोईनने प्रत्येकी दोन बळी घेतले.

आयपीएल मध्ये धावांचा पाऊस पाडलेला बटलर नुकताच इंग्लंड संघाचा 20-20 मध्ये कर्णधार झाला आहे, त्याने जेसन रॉयच्या सोबतीने या मोठया धावांचा पाठलाग करायला सुरुवात केली खरी, पण अनुभवी भुवनेश्वरने पहीले षटक अतिशय भेदक टाकताना इंग्लड संघाच्या डावाच्या चौथ्याच चेंडूवर बटलरच्या यष्ट्या उध्वस्त करत संघाला मोठे यश मिळवून देताना इंग्लड संघालाही मोठा धक्का दिला, त्यातून सावरण्याआधीच हार्दिक पंड्याने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही आपली कमाल दाखवताना  डेविड मलानला बाद करुन इंग्लंड संघाची अवस्था 2 बाद 27 अशी केली,मलानने 14 चेंडूत चार चौकार मारत 21 धावा केल्या, पण तो आपल्या संघाला चांगली सुरुवात करुन देण्यात यशस्वी ठरला नाही.

यानंतर पंड्यानेच लिविंगस्टोन आणि जेसन रॉयला बाद करुन इंग्लंड संघाची अवस्था चार बाद 33 अशी कठीण करून टाकली.यानंतर मात्र मोईन अली आणि हॅरी ब्रूक्स या जोडीने चिवट प्रतिकार केला आणि 5 व्या गड्यासाठी 61 धावांची या सामन्यातली सर्वोच्च भागीदारीही केली.अर्थात तरीही इंग्लंड संघ सामन्यात वापस आलाय असे वाटत नव्हतेच,त्यातच चहलने या जोडीला सहा धावांच्या अंतरात तंबूत परत पाठवून भारतीय संघा साठी विजय अधिकच सोपा केला.ही जोडी बाद झाल्यानंतर ख्रिस जॉर्डनने प्रतिकार चालू ठेवला पण त्याला दुसऱ्या बाजूने जराही बरी साथ मिळाली नाही ज्यामुळे इंग्लंड संघाला पूर्ण 20 षटकेही खेळता आले नाही,19.3 षटकातच त्यांचा संघ 148 धावा काढुन गारद झाला,आणि भारतीय संघाने 50 धावांनी मोठा विजय मिळवून मालिकेत विजयी सुरुवातही केली.

Vasant More : वसंत मोरे यांचे आता शिंदे सरकारला चॅलेंज, म्हणाले हिम्मत असेल तर…

हार्दिक पंड्याने 33 धावा देत चार बळी मिळवून इंग्लंड संघाला एकहाती पराभूत केले,त्याला चहल,आणि पहिलाच सामना खेळत असलेल्या अर्शदीप सिंगने दोन दोन बळी मिळवून जोरदार साथ दिली.हा विजय रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग 13 वा असुन हा एक विश्वविक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे.मालिकेतला दुसरा सामना 9 तारखेला खेळवला जाणार असून त्यातच विजय मिळवून मालिका जिंकण्याचा मानस भारतीय संघाचा असेल.अष्टपैलू कामगीरी करणाऱ्या हार्दिक पंड्याला सामन्याचा मानकरी  म्हणून घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

भारत 8 बाद 198

पंड्या 51,हुडा 33,सुर्यकुमार 39,रोहीत 24,अक्षर 17

जॉर्डन 23/2,मोईन 26/2,

विजयी विरुद्ध

इंग्लंड 19.3 षटकात सर्वबाद 148

मलान 21,ब्रूक्स 28,मोईन 36,जॉर्डन नाबाद 26

पंड्या 33/4, अर्षदीप 18/2,चहल 32/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.