Hindu Janajagruti Samiti :गोव्यात 12 जूनपासून दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन

 एमपीसी न्यूज –  गोवा येथे गेल्या 10 वर्षांपासून होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे देशात हिंदु राष्ट्राची चर्चा प्रारंभ झाली. त्यानंतर हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून विविध क्षेत्रांत कार्य करण्यास सुरवात झाली. या दहाव्या अधिवेशनात हिंदु राष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘हिंदु राष्ट्रात आदर्श  राज्य व्यवस्था कशी असावी  ?’,याविषयी दिशादर्शन करण्यासाठी  अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र संसदे’चे आयोजन हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य असेल, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक शंभू गवारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

 

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेस हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले, सनातन संस्थेचे चैतन्य तागडे, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. निलेश लोणकर, अधिवक्त्या सीमा साळुंखे, अधिवक्ता निलेश निढाळकर हे उपस्थित होते.  

 

अधिवेशनातील तीन दिवस ‘हिंदु राष्ट्र संसद’  घेतली जाणार आहे.  त्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संसदीय आणि संवैधानिक मार्ग’, ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ आणि ‘हिंदु शैक्षणिक धोरणांचा अवलंब कसा करावा ?’ यावर तज्ञांकडून विस्तृत चर्चा होणार आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी यंदा 12 ते 18 जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे,  अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक शंभू गवारे यांनी दिली.

 

गवारे म्हणाले की, कोरोनामुळे गेली दोन वर्षे हे अधिवेशन प्रत्यक्ष होऊ शकले नाही. वर्ष 2020 मध्ये ‘ऑनलाईन’ अधिवेशन घेण्यात आले. या वर्षी प्रत्यक्ष अधिवेशन होत असल्यामुळे देशभरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, हाँगकाँग, सिंगापूर, फिजी, नेपाळ या देशांसह भारतातील 26 राज्यांतील 350 हून अधिक हिंदु संघटनांच्या 1000 पेक्षा अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनात प्रामुख्याने ‘काशी येथील ज्ञानवापी मशीद’, ‘मथुरा मुक्ती आंदोलन’, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’, ‘काश्मिरी हिंदूंचा नरसंहार’, ‘मशिदींवरील भोंग्यांचे ध्वनीप्रदूषण’, ‘हिजाब आंदोलन’, ‘हलाल सर्टिफिकेट एक आर्थिक जिहाद’, ‘हिंदूंचे संरक्षण’, ‘मंदिर-संस्कृती-इतिहास यांचे रक्षण’, ‘धर्मांतर’, ‘गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे’ आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

 

सनातन संस्थेचे.चैतन्य तागडे म्हणाले की, केंद्रात आणि अनेक राज्यांत हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे सरकार आल्यामुळे राममंदिर निर्माण, लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधातील कायदे लागू होणे आणि कलम 370 हटवणे आदींविषयी सकारात्मक कार्य झाले असले, तरी काशी-मथुरेसह हिंदूंच्या अनेक धार्मिक अन् ऐतिहासिक स्थळांची मुक्ती होणे बाकी आहे.   
 
 
डॉ.निलेश लोणकर म्हणाले कि, या अधिवेशनाला प्रामुख्याने ‘सीबीआय’चे माजी हंगामी संचालक  नागेश्वर राव, काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीलन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे राष्ट्रीय प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन, भाजपचे तेलंगाणा येथील प्रख्यात आमदार टी. राजासिंह,‘पनून काश्मीर’चे श्री.राहूल कौल‘पितांबरी उद्योग समुहा’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई,पुणे येथून आयुर्वेद गोविज्ञान कौन्सिलचे संचालक,गव्यशास्त्री डॉ. स्वानंद पंडित,अधिवक्ता निलेश निढाळकर,अधिवक्त्या सीमा साळुंखे यांच्यासह अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. तसेच भारत सेवाश्रम संघ चे स्वामी संयुक्तानंद जी महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज आदी मान्यवरांची वंदनीय उपस्थितीही या अधिवेशनाला लाभणार आहे.

 

या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.