IPL 2020 : हैदराबाद सहा गडी राखून विजयी, बंगळुरूला घरचा रस्ता 

एमपीसी न्यूज – दोन्ही संघासाठी महत्त्वाच्या असलेल्या इलिमिनेटर सामन्यात हैदराबादने बंगळुरूवर सहा गडी राखून विजय मिळवला आहे. हैदराबादच्या विजयासह विराट कोहलीची बंगळुरू आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडली आहे. अंतिम फेरीसाठी आता हैदराबादची दिल्लीबरोबर लढत होणार असून, यातून जो संघ विजयी ठरेल त्याचा मुंबई सोबत अंतिम सामना होणार आहे.

बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 132 धावांचं आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघाची सुरुवातही खराब झाली. मोहम्मद सिराजने आपल्या पहिल्याच षटकात श्रीवत्स गोस्वामीला माघारी धाडलं. यानंतर मैदानात आलेल्या मनिष पांडेने आपला कर्णधार डेव्हिड वॉर्नरची उत्तम साथ देत संघाचा डाव सावरला. मात्र, मोहम्मद सिराजने उत्तम गोलंदाजांची करय डेव्हिड वॉर्नरला माघारी धाडलं. दुसऱ्या विकेटसाठी वॉर्नरने पांडेसोबत 41 धावांची भागीदारी केली.

मनिष पांडेही झॅम्पाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 24 धावा काढून माघारी परतला. युवा प्रियम गर्गही फारशी चमक दाखवू शकला नाही. अनुभवी केन विल्यमसनने सावध खेळ करत डाव सावरला होता. जेसन होल्डरला सोबत घेऊन विल्यमसनने फटकेबाजी करत हैदराबादला विजयाच्या जवळ नेले. अखेरच्या षटकात विजयासाठी आठ धावांची गरज असताना होल्डरने दोन चौकार लगावत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने 2, झॅम्पा आणि चहलने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

त्याआधी नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू कडून कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी सलामीला आला. परंतू दुसऱ्या षटकात जेसन होल्डरने विराट कोहलीला झेलबाद केलं, त्याने सहा धावा केल्या. देवदत पडीकलही लगेच माघारी परतला. होल्डरच्या गोलंदाजीवर प्रियम गर्गने त्याचा सुरेथ झेल घेतला. बंगळुरूचा संघ संकटात सापडलेला असताना फिंच आणि डिव्हीलियर्स यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. फिंचने 32 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर त्याच षटकात मोईन अली धावबाद झाला.

एकीकडे डिव्हीलियर्सने संघाचा मोर्चा सांभाळात फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतू दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची त्याला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. सोळाव्या षटकात बंगळुरूने शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला. याच षटकात चौकार लगावत डिव्हीलियर्सने आपलं अर्धशतकही झळकावलं. अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या नादात डिव्हीलियर्सची नटराजनच्या यॉर्कर चेंडूवर माघारी परतला. त्याने 56 धावांची खेळी केली. यानंतर तळातल्या फलंदाजांनी बंगळुरूला 131 धावांचा टप्पा गाठून दिला. हैदराबादकडून जेसन होल्डरने 3, टी. नटराजनने 2 तर शाहबाज नदीमने 1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.