Mpc News Vigil : पोलिसच असुरक्षित! पिंपरी-चिंचवड शहरात वर्षभरात 38 पोलिसांवर हल्ले

इतर सरकारी नोकरांवर हल्ल्याच्या सात घटना

एमपीसी न्यूज – पोलीस हा घटक समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबत असतो. समाजात कुणालाही असुरक्षित वाटत असेल तर नागरिक थेट पोलिसांची मदत घेऊ शकतात. पण नागरिकांना सुरक्षा देणारे, त्यांच्या अडचणीत मदत करणारे पोलिसच असुरक्षित झाल्याचे चित्र पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण झाले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात तब्बल 38 पोलिसांवर हल्ले झाले आहेत. तर इतर सरकारी नोकरांवर हल्ल्याच्या सात घटना घडल्या आहेत.

अनेक जणांना पोलीस दिसताच मनात भीती, कपाळावर आठ्या येतात. आता पोलीस काहीतरी कारवाई करणार, अशी उगाच नागरिकांच्या मनात भीती असते. पण हे पोलीस समाजाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावतात. वाहतुकीच्या व्यवस्थापनापासून, मंत्र्यांच्या सुरक्षा, शहर, गाव वस्त्यांवर गस्त, किरकोळ चोरट्यांपासून मोठमोठ्या गुन्ह्यांच्या तपासात पोलीस कार्यरत असतात. पण समाजाची सुरक्षा करणारे पोलिसच आज सुरक्षित राहिलेले नाहीत.

चिंचवड परिसरात वाहतुकीचे नियमन करत असलेल्या एका वाहतूक पोलिसाला धडक देऊन कारच्या बोनेटवर चढवून तब्बल एक किलोमीटर नेल्याची घटना अलीकडचीच आहे. कोरोना काळात कार्यरत असलेल्या पोलिसांशी रस्त्याने विनाकारण फिरण्यासाठी हुज्जत घालून धिंगाणा घातल्याचा देखील घटना घडल्या आहेत. किरकोळ शाब्दिक वाद करता करता पोलिसांना धक्काबुक्की करत बेदम मारहाण देखील झाली आहे.

पोलिसांप्रमाणेच इतर सरकारी खात्यामध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी देखील अनेक वेळेला नागरिकांच्या रोषाला बळी पडतात. वर्षभरात सात सरकारी नोकरांवर हल्ले झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. या सातही घटनांमधील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. जानेवारी, ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी एक घटना तर मार्च आणि जुलै महिन्यात इतर सरकारी नोकरांवर हल्ल्याच्या प्रत्येकी दोन घटना घडल्या आहेत.

जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात 38 पोलिसांवर हल्ले झाले. पोलिसांवर हल्ले करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्या सर्व गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी थेट कारागृहात केली. वर्षभरात सरकारी नोकरांवरील हल्ल्याच्या एकूण 45 घटना घडल्या आहेत.

हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी 33 पोलिसांवर तर 16 अन्य सरकारी कर्मचा-यांवर असे एकूण 49 प्रकार घडले होते. त्यातील दोन गुन्ह्यांचा तपास लागलाच नाही.

वर्षभरात पोलिसांवर झालेले हल्ले –

जानेवारी – 2
फेब्रुवारी – 4
मार्च – 5
एप्रिल – 4
मे – 4
जून – 4
जुलै – 1
ऑगस्ट – 2
सप्टेंबर – 2
ऑक्टोबर – 5
नोव्हेंबर – 5

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.