IND-ENG T-20 : दुसऱ्या सामन्यातील दणदणीत विजयासह भारताने जिंकली मालिकाही

बर्मिंगहॅम सामन्यासकट भारतीय संघाने जिंकली मालिकाही. भुवनेश्वर ठरला विजयाचा शिल्पकार!

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) –  पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत (IND-ENG T-20) विजयी सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाने आज बर्मिंगहॅम येथे झालेल्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यातही तसाच जोरदार खेळ करत इंग्लंड संघावर 49 धावांनी आणखी एक मोठा विजय मिळवला आणि त्याचसोबत मालिकाही जिंकली.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्या निर्धारित 20 षटकात 170 धावा करुन त्या धावसंख्येचे रक्षण करताना बलाढ्य इंग्लंड संघाला फक्त 121 धावात गुंडाळून 49 धावांनी मोठा विजय मिळवून तीन सामन्याच्या मालिकेत 2/0 अशी विजयी आघाडीही घेतली आहे.

तीन सामन्याच्या मालिकेतला (IND-ENG T-20) पहिला सामना हारल्यानंतर विजयासाठी आसुसलेल्या इंग्लंड संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.तर पहिला सामना दणदणीत जिंकलेल्या भारतीय संघाने आपल्या विजयी संघात चार बदल केले,आक्रमक पंत,अष्टपैलू जडेजा,कोहली आणि बुमराहला संघात स्थान देताना ईशान किशन ,दीपक हुडा,श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांना राखीव मध्ये बसवले.

Today’s Horoscope 10 July 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

भारतीय संघाच्या डावाची सुरुवात आज पहिल्यांदाच पंत आणि रोहित यांनी केली,त्यांनी दणदणीत सुरूवात देताना पहिल्या 4 षटकात मध्ये 43 धावा ठोकल्या,ही जोडी इंग्लिश गोलंदाजाना फोडून काढत असताना आज आंतरराष्ट्रीय पदार्पण तेही  वयाच्या 34 व्या वर्षी करणाऱ्या  ग्लेसनने आपल्या पहिल्याच षटकात रोहीतचा झंझावात खल्लास केला,अर्थात यात बटलरचा वाटा खूप मोठा होता, त्याने  एक अप्रतिम झेल घेत,रोहीतची छोटी पण अतिशय  स्फोटक खेळी समाप्त केली.

रोहीतने  20 चेंडूत 31 धावा चोपल्या,ज्यात 3 चौकार आणि दोन षटकार सामील होते. या झंझावाती फलंदाजीमुळे  भारताने आपल्या पहिल्या सहा षटकात 1 बाद 61 केल्या, ज्यात तरीही 15 चेंडु डॉट्स होते, मात्र  नवोदित ग्लेसननेच कोहलीला सुद्धा बाद केले,त्याचा डेविड मलानने अप्रतिम झेल घेतला,कोहलीचे अपयश मात्र काही केल्या संपता संपत नाही. त्या पाठोपाठ त्यानेच आक्रमक खेळत असलेल्या पंतला बाद करून भारतीय संघाची अवस्था तीन बाद 61 केली.

ग्लेसनने पहिल्याच सामन्यात चार चेंडूत तीन तर आपल्या पहिल्याच षटकात रोहितची अनमोल विकेट घेऊन आपले पदार्पण चांगलेच गाजवले,त्याचे पृथक्करण यावेळी  दोन ओव्हर्स 6 धावा तीन बळी असे होते. या पडझडीमुळे एक वेळ जबरदस्त सुरुवात करण्याऱ्या  भारताच्या पहिल्या 10 षटकानंतर 3बाद 85  धावा झाल्या होत्या.

Ashadhi Ekadashi Mahapooja: मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा

यानंतर सर्व आशा पहिल्या सामन्याचा मानकरी हार्दिक पंड्या आणि युवा सुर्यकुमार यादव यांच्यावरच केंद्रीत झाल्या होत्या, मात्र 11 व्या षटकात ख्रिस जोर्डनने ही जोडी लागोपाठच्या चेंडूवर फोडून भारतीय संघाला आणि त्या आशेला फार मोठा सुरुंग लावला. यावेळी भारतीय संघाची अवस्था 5 बाद 89 अशी झाली होती.

त्यानंतर अष्टपैलू जडेजा आणि भरवशाचा दिनेश कार्तिक या जोडीने प्रतिकार सुरू ठेवला.एरव्ही नेहमीच जोशात खेळणाऱ्या कार्तिकला आज मात्र एकेक धावेसाठी झगडावे लागत होते, या जोडीने 33 धावा जोडल्या असतानाच कार्तिकची धडपड वैयक्तिक 12 धावांवर समाप्त झाली, त्याला बटलरने धावबाद केले,कार्तिक बाद झाला आणि भारतीय संघ चांगलाच अडचणीत आला,पण अष्टपैलू जडेजाने आपली जबाबदारी ओळखून ती सार्थ पार पाडली आणि भारतीय संघाला 170 धावांची बऱ्यापैकी सन्मान जनक  धावसंख्या गाठून दिली, त्याने 29 चेंडूत नाबाद 46 धावा करत आपले महत्त्व अधोरेखीत केले.

त्याला तळाच्या फलंदाजांनीही चांगली साथ दिली.जोरदार सुरुवात झाल्यानंतरही निराश न होता इंग्लिश गोलंदाजानी केलेल्या चांगल्या गोलंदाजीने भारतीय संघाला 170 धावांवर रोखून चांगले पुनरागमन केले,जोर्डनने चार तर आपल्या पहिल्याच सामन्यात ग्लेसनने तीन गडी बाद करुन सर्वांनाच प्रभावीत केले.

Ashadhi Ekadashi 2022 : बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी; मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

मालिका रोमांचक ठेवण्यासाठी आणि आपले आव्हानही जिवंत ठेवण्यासाठी इंग्लंड संघाला 120 चेंडूत 171 धावांचे लक्ष्य पार करायचे होते, मात्र भुवनेश्वरने आजही आपल्या आणि इंग्लंडच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला रोहीतच्या हातात झेल द्यायला लावून बाद केले आणि भारतीय संघाला सनसनाटी सुरुवात करुन दिली.

या धक्क्यातून सावरण्याआधीच आपल्या दुसऱ्या षटकात खतरनाक जॉस बटलरला एका अप्रतिम स्विंगवर चकवले आणि पंतने एक अप्रतिम झेल घेत बटलरची मोठी विकेट मिळवून दिली. या वेळी पंचांनी हे अपील फेटाळून लावले होते, पण पंतने जबरदस्त आत्मविश्वास दाखवत डीआरएस घेण्यास रोहीतला भाग पाडले आणि अर्थातच तो झेल बाद असल्याचे सिद्ध झाले आणि भारतीय संघाला एक स्वप्नवत सुरुवात मिळाली.

यानंतर 20/20 मधला एक खतरनाक म्हणून ओळखला जाणारा फलंदाज डेविड मलान आणि लिविंगस्टोन यांनी प्रतिकार चालू ठेवला, लिव्हिंगस्टोनने आक्रमक सुरुवात केली खरी, पण त्याला त्यात फारसे यश मिळाले नाही, बुमराहने त्याला 15 धावांवर असताना त्रिफळाबाद केले आणि इंग्लंड संघाची अवस्था 5 व्या षटकात3 बाद 27 अशी बिकट केली.

बुमराहने हे षटक निर्धाव टाकले. असे करण्याचे ही बुमराहची 9 वी वेळ आहे. या जबरदस्त गोलंदाजीमुळे इंग्लंड संघाची पहिल्या पॉवरप्ले नंतर सहा षटकात 3 बाद 36 अशी झाली होती. त्यातच यजुर्वेद्र चहलने आपल्या पहिल्याच षटकात ब्रूक्सला सूर्यकुमारच्या हातून झेलबाद केले आणि इंग्लंड संघ पुरता अडचणीत आला.

या  कठीण प्रसंगी फलंदाजीसाठी आला तो मोईन अली. त्याने मलानसोबत पुढे लढाई चालू ठेवली पण खतरनाक मलानला आज मात्र त्याच्या किर्तीला साजेसा खेळ करता आला नाही. 19 धावांवर असताना चहलने त्याला हर्षल पटेलच्या हातून झेल बाद करुन इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठवला आणि इंग्लंड संघाला पुरते खिंडीत अडकवले. पाठोपाठ सॅम करनही आला आणि लगेचच तंबूत परतला. त्याला बुमराहने बाद केले आणि इंग्लड संघाची अवस्था सहा बाद साठ अशी झाली.

यावेळी इंग्लंड संघ हा सामना आणि मालिका गमावणार याची खात्री वाटायला लागली होतीच, फक्त किती वेळात आणि किती फरकाने एवढीच उत्सुकता बाकी होती. मोईन अली आणि डेविड विलीने आपल्या परीने प्रतिकार केला पण तो फारच दुबळा आणि तोकडाही ठरला. मोईन अलीने 35 तर विलीने नाबाद 33 धावा केल्या, पण त्या ना संघाला विजय मिळवून देऊ शकल्या ना पराभवाला लांबवू शकल्या. त्यांनी पराभवातले अंतर मात्र कमी केले इतकेच.

एकापाठोपाठ एक विकेट पडत होत्या आणि भारतीय संघ आणखी एका मालिका विजयाकडे अग्रेसर होत होता. अखेर हर्षल पटेलने पार्किन्सनला भोपळाही न फोडू देता त्रिफळाबाद केले आणि इंग्लंड संघ 17 व्या षटकातच धारातीर्थी पडला. याच बरोबर भारतीय संघाने इंग्लंड मध्ये मालिका जिंकण्यचा पराक्रम केला, पण लागोपाठ चौदावा विजय मिळवून रोहितने आपल्या कारकिर्दीत एक विश्वविक्रम करुन मानाचा तुरा रोवला आहे.

इंग्लंड संघाला फक्त 121 धावात गुंडाळून भारतीय संघाने 49 धावांनी आणखी एक मोठा विजय मिळवला आणि त्या सोबतच ही मालिकाही जिंकली आहे. भारतीय संघाकडून भुवनेश्वरने सर्वाधिक तीन तर बुमराह आणि चहलने प्रत्येकी दोन बळी मिळवून त्याला चांगली साथ दिली तर हार्दिक पंड्या आणि हर्षल पटेलनेही एकेक गडी बाद करत आपलाही यशस्वी वाटा उचलला.

अप्रतिम गोलंदाजी करुन इंग्लिश संघाच्या डावाला खिंडार पाडणाऱ्या भुवनेश्वरला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.
मालिकेतला तिसरा आणि अंतीम सामना उद्या होणार असून त्यातही विजय मिळवून भारतीय संघ  इंग्लंडला 3/0 असा व्हाईटवॉश देणार का हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकात 8 बाद 170
रोहीत 31, पंत 26, यादव 15, हर्षल पटेल 12, जडेजा नाबाद 46
जोर्डन 27/4, ग्लेसन 15/3
विजयी विरुद्ध
इंग्लंड 17 षटकात सर्वबाद 121
लिव्हिंगस्टोन 15, मोईन अली 35, मलान 19, विली नाबाद 33
भुवनेश्वर 15/3, बुमराह 10/2, चहल 10/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.