India vs wI-भारताची सामन्यावर मजबूत पकड

रोहितचा विश्वविक्रम

एमपीसीन्यूज:(विवेक कुलकर्णी)भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात केलेल्या विक्रमी (India vs WI)फलंदाजीमुळे बेजान सामन्यात आली जाण

 

मोहम्मद सिराजने अतिशय निर्जीव अशा खेळपट्टीवर केलेल्या दाहक गोलंदाजीमुळे आणि त्यानंतर रोहीतच्या विश्वविक्रमी फलंदाजीमुळे आणि ईशान किशनच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे तिसऱ्या दिवसापर्यंत अनिर्णित होईल असे वाटत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने रंगत निर्माण केलेली आहे.

 

भारतीय संघाने दुसऱ्या डावात तुफानी फलंदाजी केली ज्यामुळे भारतीय संघाच्या नावावर काही विश्वविक्रमही नोंदवले गेले. भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 181 वर घोषित केला,ज्यामुळे विंडीज संघापुढे सामना जिंकण्यासाठी 365 धावांचे अशक्यप्राय लक्ष दिले,ज्याचा पाठलाग करताना विंडीज संघाने कालच्या चौथ्या दिवसाखेर दोन बाद 76 धावा केल्या आहेत. भारतीय संघाला सामना आणि मालिका जिंकण्यासाठी 8 विकेट्सची गरज आहे तर विंडीज संघाला जवळपास 300 धावा काढण्याचे शिवधनुष्य उचलावे लागणार आहे.

आज सकाळी खेळ सुरु झाला तेंव्हा विंडीज संघ आणखी किती वेळ भारतीय गोलंदाजीला तोंड देणार याची उत्सुकता होती,पण मोहम्मद सिराजने आपल्या छोट्या कसोटी कारकिर्दीतली सर्वोत्तम गोलंदाजी करताना विंडीज संघाचा अर्धा डाव आणि संपूर्ण प्रतिकार (India vs WI)मोडून काढला.

Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या अंत्यसंस्काराला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार
सिराजने आज आपल्या कसोटी कारकिर्दीतली दुसऱ्यांदा पाच बळी घेण्याची कामगिरी करताना आपल्या कसोटी कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरीही नोंदवली.या भेदक गोलंदाजीमुळेच विंडीज संघ 5 बाद 229 अशा मजबूत स्तिथीतून सर्वबाद 255 अशा दिली दयनीय परिस्थितीत आला.सिराजला युवा मुकेशकुमारने चांगली साथ देत आपल्या कसोटी कारकिर्दीचा शानदार आगाज केला.जडेजाने 2 तर अश्विनने एक गडी बाद केला.

यानंतर आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात करताना रोहीत आणि यशस्वी जैस्वालने अतिशय आक्रमक सुरुवात केली.या जोडीने केवळ 33 चेंडूत अर्धशतकी सलामी देताना भारतीय संघातर्फे आजपर्यंतची सर्वांत जलदगतीने अर्धशतकी सलामी नोंदवून आपल्या नावावर हा विक्रम केला.

त्याचबरोबर रोहितने महेला जयवर्धनेच्या नावावर असलेल्या एका व एकमेव अशा अनोख्या विक्रमाला आपल्या नावावर केले आहे.सलग 30 डावात दुहेरी आकडा पार करणारा क्रिकेट जगतातला रोहित आता एकमेव कसोटीपटू ठरला आहे, याआधी महेलाने सलग 29 डावात अशी कामगिरी करून हा विक्रम आपल्या नावावर केला होता.

रोहितने केवळ 35 चेंडूत या मालिकेतले आपले आणखी एक अर्धशतक पुर्ण केले ज्यात 4 चौकार आणि 3 षटकात सामील होते.त्याला यशस्वी जैस्वालनेही उत्तम साथ दिली. त्यामुळेच या जोडीने टी-20 स्टाईल पध्दतीने फलंदाजी करताना जवळजवळ प्रत्येक षटकात 9 धावांच्या सरासरीने धावा करत विंडीज संघाला दडपणाखाली आणले.

ही जोडी विक्रमी सलग तीन वेळा शतकी सलामी देण्याची कामगिरी आपल्या नावावर आज हमखास नोंदवणार असे वाटत असतानाच रोहित त्याच्या टीपीकल आणि अतिशय लाडक्या हूकच्या फटक्यावर बाद झाला आणि हा हातातोंडाशी आलेला विक्रम होवू शकला नाही.

रोहितने अतिशय शानदार फटकेबाजी करत केवळ 44 चेंडूत 57 धावा केल्या,ज्यात 5 चौकार आणि तीन उत्तुंग षटकार सामील होते. तो बाद झाला अन गील मैदानावर आला,आणि अगदी तेंव्हाच पावसाने पून्हा सामन्यात व्यत्यय आणला.

भारतीय संघाने जवळजवळ 12 च्या सरासरीने धावा ठोकल्या ,हा सुद्धा एक अनोखा असाच विक्रम आहे. पावसानंतर खेळ पुन्हा सुरू झाला, पण वेगवान धावा जमवण्याच्या नादात यशस्वी 38 धावा करुन बाद झाला,त्यानंतर ईशान किशनला बढती देण्यात आली,ज्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला आणि केवळ 34 चेंडूतच आपली पहिले अर्धशतक पूर्ण केले,ज्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकार सामील होते, त्याला गीलनेही चांगली साथ दिली.ईशानचे अर्धशतक पूर्ण होताच भारतीय संघाने आपला दुसरा डाव घोषित केला, ज्यामुळे विंडीज संघासमोर सामना जिंकण्यासाठी 365 धावांचे विशाल लक्ष उभे राहीले.

याचा पाठलाग करताना विंडीज संघाची सुरु वात खराब झाली. पहिल्या डावात सर्वाधिक धावा काढणारा कर्णधार ब्रेथवेट दुसऱ्या डावातही अश्विनचीच शिकार ठरला, त्याने 28 धावा केल्या, त्यानंतर आलेल्या कर्क मॅकेंझीलाही अश्विनने आल्यापावलीच पायचीत केले आणि विंडीज संघाची अवस्था दोन बाद 44 अशी केली, यानंतर मात्र चंद्रपॉल आणि ब्लॅकवुड ने दिवसाखेर भारतीय संघाला आणखीन यश मिळू दिले नाही आणि चिवट प्रतिकार करत 32 धावांची बहुमूल्य अन नाबाद भागीदारीही केली.

उद्याच्या दिवसात विंडीज संघाला आपल्या विकेट्स सांभाळून ठेवणे वा विजयासाठीच्या 291 धावा करणे अशी अशक्यप्राय आव्हाने आहेत, जी आताचा विंडीज संघ बघता निव्वळ अशक्यप्राय वाटत आहेत, जरीही क्रिकेट हा अतिशय अनिश्चिततेचा खेळ आहे,हे मान्य केले तरीही. विंडीज संघासाठी पाउस सुखकर्ता तर त्याचवेळी भारतीय संघासाठी दुखकर्ता ठरु शकतो, यातले नक्की काय होईल ते उद्याच(India vs WI) कळेल.

संक्षिप्त धावफलक
भारत
पहिला डाव 438
आणि दुसरा डाव 2 बाद 181 (डाव घोषित)
रोहित 57,यशस्वी 38,ईशान नाबाद 52,गील नाबाद 29
वारीकन 33/1,गाब्रिअल 36/1

विंडीज पहिला डाव
सर्वबाद 255
ब्रेथवेट 75,चंद्रपॉल 33,अथानेज 37
सिराज 60/5,मुकेशकुमार 48/2
दुसरा डाव
2 बाद 76
ब्रेथवेट 28,चंद्रपॉल नाबाद 24,ब्लॅकवूड नाबाद 20
अश्विन 33/2

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.