3rd T20 highlights: टी-20 तही भारताच्या विजयाची हॅटट्रिक

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी)   एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत विंडीजला पहिल्यांदाच व्हाईटवॉश दिल्यानंतर कमालीचा आत्मविश्वास बळावलेल्या भारतीय संघाने टी -20 तही तशीच दैदिप्यमान कामगीरी करत विंडीजला आणखी एक व्हाईटवॉश दिला. आजच्या सामन्यात विंडीज संघाला भारताने 17 धावांनी पराभूत करून मालिकेत 3/0 असे निर्भेळ यश मिळवले. 22 धावा देत आपल्या छोट्याशा कारकिर्दीत तीन बळी मिळवून सर्वोत्तम कामगिरी करणारा हर्षल पटेल विजयाचा आणखी एक महत्वाचा शिलेदार ठरला.

मालिका आधीच जिंकली असल्याने निकालाच्या दृष्टीने या सामन्याच्या निकालाला खास काही फरक पडणार नव्हता,त्यामुळे भारतीय व्यवस्थापनाने राखीव खेळाडूंना संधी देण्यास प्राधान्य दिले. ऋतुराज गायकवाड या पुणेरी युवा फलंदाजाची प्रतिक्षा आज संपली.त्याचबरोबर आवेश खानला ही आंतरराष्ट्रीय सामन्याचे दरवाजे उघडले. शार्दूल ठाकूरला पुढील काही सामन्यात विश्रांती दिली असल्याने त्यालाही आज संधी मिळाली.तर कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला खेळवण्यात आले.

आज विंडीज कर्णधार पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. आज रोहीत ऐवजी ऋतुराज आणि ईशान किशनने डावाची सुरुवात केली.आयपीएल गाजवून आपल्या नावाचा डंका पिटवणाऱ्या ऋतूराजला आज तरी विशेष काही करता आले नाही.

एक खणखणीत चौकार मारून खाते उघडल्यानंतर होल्डरच्या चेंडुवर तसाच फटका मारण्याची घाई त्याला नडली. आणि तो झेल सोडण्याची चूक मेयरने केली नाही. यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 1 बाद दहा अशी होती.त्यानंतरच चेंडूवर श्रेयसचा एक झेल स्लिपमध्ये सुटला ,अन पुढच्याच चेंडूवर त्याने मिडऑफच्या डोक्यावरून खणखणीत चौकार मारून विंडीजच्या जखमेवर मीठ चोळले.

या दोघांनी जबरदस्त फटकेबाजी करून डाव सावरला,बघताबघता या दोघांनी केवळ 34 चेंडूतच अर्धशतकी(53 )भागिदारी केली,ही जोडी जमली आहे असे वाटत असतानाच श्रेयस अय्यर वॉल्शला जोरदार फटका मारायला गेला,जो चुकला आणि जेसन होल्डरच्या सुरक्षित हातात जावून स्थिरावला.श्रेयसने 16 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानंतर खेळायला आला तो कर्णधार रोहीत शर्मा.नेमके या परिस्थितीतच ईशान किशनचा संयम संपला आणि तो 34 धावा करून चेसच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला.

या पडझडीमुळे पहिल्या दहा षटकाचा खेळ संपला तेंव्हा भारतीय संघाची धावसंख्या 3 बाद 68 अशी होती.नेहमी धुवांधार खेळणाऱ्या रोहीतची बॅट आज काहीच चमत्कार दाखवू शकली नाही,पंधरा चेंडूत केवळ सात धावा काढल्यानंतर तो डोमनिक ड्रेकच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला.त्याच्या संथ फलंदाजीमुळे भारताची अवस्था पंधरा षटकानंतर 4 बाद 104 अशी झाली होती.

एकटा सूर्यकुमार सोडला तर इतर सर्व फलंदाजांना धावा काढण्यासाठी बऱ्यापैकी झगडावे लागत होते.त्यानंतर मात्र वेंकटेश अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांची जोडी जमली आणि जोडीने वेगवान खेळी करत विंडीज गोलंदाजीवर चौफेर हल्ला करत चौकार ,षटकारांची बरसात करत तब्बल 91 धावांची भागिदारी ती ही केवळ 41 चेंडूत पूर्ण  करत भारताला 184 धावाची सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.अखेरच्या पाच षटकात तब्बल 80 धावांचा पाऊस पडला.

यादव डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला.त्याने 65 या त्याच्या कारकिर्दीतल्या सर्वोच्च धावाही आज नोंदवल्या. ज्या केवळ 31 चेंडूत आल्या,ज्यामध्ये 7 षटकार आणि केवळ एकच चौकार सामील होता.याचदरम्यान सूर्यकुमारने आपले चौथे अर्धशतकही पूर्ण केले तेही केवळ 27 चेंडूत,त्याला व्ही अय्यरने सुद्धा  नाबाद 35(19 चेंडू, चार चौकार आणि दोन षटकार) धावा करून  चांगली साथ दिली.या दोघांच्या जबरदस्त फलंदाजीने भारतीय डावाला आकार आला.

उत्तरादाखल खेळताना विंडीज संघाची सुरुवात अतिशय खराब झाली.डावाच्या पहिल्याच षटकात कायले मेयर्स ईशान किशनच्या हातात झेल देऊन दीपक चाहरची शिकार ठरला.त्याला केवळ सहा धावा करता आल्या,संघाच्या धावसंख्येत  केवळ 20धावांची भर पडलेली असतानाच शाई होप सुध्दा झेल किशन गोलंदाज दीपक अशाच पद्धतीने वैयक्तिक 8 धावांवर बाद झाला.

यानंतर जोडी जमली ती दुसऱ्या सामन्यात जबरदस्त प्रतिकार करणाऱ्या पूरन आणि पॉवेल या तुफानी फलंदाजांची.यांनी तुफानी फटकेबाजी केल्याने विंडीजची धावसंख्या पहिला पॉवरप्ले संपल्यानंतर दोन बाद 68 अशी होती.ही जोडी पुन्हा एकदा भारतीय संघाची डोकेदुखी ठरेल असे वाटत असतानाच हर्षल पटेलने आपली कमाल दाखवत पॉवेलचा खेळ 25 धावांवर खल्लास केला.

त्याने या धावा केवळ 14 चेंडूतच काढल्या, हर्षल पटेलला उंच फटका मारण्याची घाई त्याला नडली आणि शार्दुल ठाकूरने एक अप्रतिम झेल घेत त्याची छोटी पण स्फोटक खेळी संपवण्यात मोठा वाटा उचलला.यानंतर थोड्याच वेळात कर्णधार पोलार्ड पण स्वस्तात बाद झाला.वेंकटेश अय्यरने त्याला बाद करत विंडीजला मोठा धक्का दिला,पाठोपाठ त्याने होल्डरलाही बाद केले आणि विंडीजची अवस्था सहा बाद 100 झाली.

यावेळी भारतीय संघाला एकदिवसीय सामन्यातल्या मालिकेसारखे निर्भेळ यश खुणावत होते,फक्त एकच अडसर भारताच्या आणि विजयाच्या मध्ये होता, तो म्हणजे निकोलस पुरनचा.या पडझडीतही त्याने या मालिकेतले आपले लागोपाठचे तिसरे अर्धशतक पुर्ण केले.जे केवळ 38 चेंडूत आले होते, ज्यात सहा चौकार आणि एक षटकार सामील होता.

त्याचा धडाका अर्धंशतक पूर्ण झाल्यानंतरही चालूच होता,तो काही तरी चमत्कार करेल असे वाटत असतानाच शार्दूल ठाकूरने त्याला चकवले आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेवून ईशान किशनच्या ग्लोव्हजमध्ये स्थिरावला.पुरनने 61 धावा केल्या.यानंतर केवळ आणि केवळ भारतीय संघाच्या विजयाची औपचारिकताच बाकी होती.

शेवटच्या षटकात विजयासाठी 23 धावा हव्या असताना शार्दूल ठाकूरने केवळ पाचच धावा दिल्या आणि आपल्या संघाला 17 धावांनी आणखी एक विजय मिळवून दिला.रोहीत शर्माच्या पूर्णवेळ नेतृत्वाखाली खेळत असताना लागोपाठ दोन वेगवेगळ्या फॉरमॅट मधल्या मालिकेतल्या निर्भेळ विजयाने भारतीय संघ टी-20 च्या फॉरमॅट मध्ये पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर विराजमान झाला आहे.रोहीतच्या नेतृत्वाखाली हा 25 व्या सामन्यातला 21 वा विजय आहे.

सूर्यकुमार यादवची धडाकेबाज फलंदाजी,वेंकटेश अय्यरची अष्टपैलू कामगिरी, हर्षल पटेलची जादूई गोलंदाजी या विजयातल्या महत्वपूर्ण बाबी आहेत,पण ईशान किशनचे अपयश, रोहितची पहिल्या सामन्यातली फलंदाजी सोडली तर नंतरची अपयशी फलंदाजी या काही कमकुवत गोष्टींचा भारतीय संघ व्यवस्थापनाला नक्कीच विचार करावा लागेल, पण आता या क्षणी तरी या दणदणीत विजयाचा आनंदोस्तव साजरा करण्याची वेळ आहे,नाही का? आजच्या विजयात धुवांधार 65 धावा करून विजयाचा पाया रोवणाऱ्या सूर्यकुमार यादवला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

धावफलक 

भारत

5 बाद 186

यादव 65, ईशान किशन 34,व्ही अय्यर नाबाद 35

विंडीज 9 बाद 167

पूरन 61,पॉवेल 25,शेफर्ड  29

हर्षल पटेल 22 /3

चाहर 15/2,ठाकूर 33/2 वेंकटेश 23/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.