IND vs SA : भारताची सामन्यावर मजबूत पकड ; विजय फक्त 6 पाऊले दूर

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : आजपर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकता आली नाही हे शल्य दूर होण्याची वेळ आता अगदी हाकेच्या अंतरावर आहे. उद्या आजच्या सारखीच पावसाने उघडीप घेतली तर भारतीय संघ उद्या विजयाच्या भोज्याला हमखास शिवू शकतो, आजचा खेळ संपला तेंव्हा दक्षिण आफ्रिका संघाने 305 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना चार गडी गमावून 94 धावा केल्या आहेत.

आज सकाळी भारतीय संघाने कालच्या एक बाद 16 वरून पुढे खेळायला सुरुवात केली, पण आज भारतीय संघाची सुरुवात आणि एकंदरीतच  फलंदाजी अजिबात चांगली झाली नाही, शार्दुल ठाकूर आपल्या कालच्या धावसंख्येत फारशी भर घालू शकला नाही आणि वैयक्तिक दहा धावांवर रबाडाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

त्यानंतर पहिल्या डावातला शतकवीर लोकेश राहुल सुद्धा फारसे विशेष काही न करता 23धावांवर इंगीडीची शिकार ठरला, तर कर्णधार कोहली सुद्धा केवळ अठरा धावांवर जन्सेनच्या गोलंदाजीवर बाद झाला,अर्थात पहिल्या डावातली महत्वपूर्ण आघाडी आणि खेळपट्टीचे बदललेले स्वरूप बघता 200 ते 225 धावा विजयासाठी भरपूर ठरतील असा अंदाज अनेकदा समालोचक मांडत होतेच, पण तरीही दडपण नसताना तरी खराब फॉर्म मधल्या खेळाडूंनी या संधीचा फायदा उठवावा ही अपेक्षा संघ व्यवस्थापनाची असली तर त्यात गैर काय? पण दुर्दैवाने यात ना रहाणे सफल ठरला ना पुजारा ना स्वतः कोहली सुद्धा.

मागील कित्येक सामन्यातली यांची खराब कामगिरी आजही तशीच राहिली आणि हे सर्व महारथी अतिशय स्वस्तात बाद झाले,मात्र ऋषभ पंतच्या 34 आणि बुमराहच्या तडाखेबंद 15 धावामुळे भारतीय संघ 174 धावा करू शकला ,ज्या पहिल्या डावातल्या 130 च्या आघाडीमुळे 304 चे मोठे लक्ष्य होऊन गेले. आफ्रिकेकडून रबाडा आणि  जन्सेनने प्रत्येकी चार तर लुंगीएंगीडीने दोन गडी बाद केले. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 34 धावा केल्या तर राहुलने 23,रहाणेने 20 धावा केल्या, कर्णधार कोहली 18च धावा करू शकला.

305 धावांचे लक्ष्य तेही चौथ्या आणि पाचव्या दिवशी मायदेशी सुद्धा या आफ्रिकन संघांला नक्कीच आवाक्याबाहेर आहे,पण क्रिकेट मध्ये याआधी सुद्धा कितीतरी वेळा चमत्कार झालेले असल्याने हे लक्ष्य आफ्रिका गाठूच शकणार नाही असे कोणी ठामपणे म्हणणार नाही, पण आज भारतीय संघाकडे सर्वोत्तम जलदगती गोलंदाजांचा ताफा आहे,त्यांच्यापुढे हा नवखा आफ्रिकन संघ किती तग धरेल हेही म्हणणे खरेच होते,आणि  नेमकी त्यातच  पुन्हा एकदा यजमान संघाची सुरुवात खराबच झाली.

दुसऱ्या डावाच्या नवव्याच चेंडूवर मार्करम शमीच्या एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळा बाद झाला तर युवा मोहम्मद सिराजने पीटरसनला तंबूत परत पाठवून यजमानांना दुसरा मोठा धक्का दिला. यावेळी दक्षिण आफ्रिका संघाची अवस्था दोन बाद 34 अशी झाली होती. मात्र त्यानंतर कर्णधार डीन एलगर आणि व्हॅनडेरसेन या जोडीने नेटाने खिंड लढवत बुमरा आणि कंपनीच्या तोफखान्याचा धीराने सामना केला. या दोघांनीही धावा जमवताना अतिशय धीरोदात्त फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांना बराच वेळ आणखी यश मिळवू दिले नव्हते. मात्र शमीने पुन्हा एकदा हल्ला बोल करत व्हॅनडेरसेनला त्रिफळाबाद करून भारतीय संघाला तिसरे यश मिळवून दिले.

त्यानंतर आलेल्या केशव महाराजला नाईट वाचमेन म्हणून पाठवण्यात आलेला निर्णय बुमराहच्या एका जबरदस्त यॉर्कर ने त्याच्या उडवलेल्या त्रिफळ्याइतकाच चितपट ठरवला, महाराज बाद झाल्यानंतर आजच्या दिवसाचा खेळ थांबला असे पंचानी जाहीर केले,त्याच्या काही क्षण आधीच कर्णधार डीन एलगर आपले अठराव्या कसोटी अर्धंशतक पूर्ण केले होते ,त्याने आज अप्रतिम खेळ करत तुफानी भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत एक अविस्मरणीय खेळी आज तरी पुर्ण करून कप्तान पदाला न्याय देण्यात यश मिळवले आहे,मात्र उद्या तो  किती वेळ तग धरेल ते उद्या कळेलच.

पण आज तरी या कसोटीवर भारतीय संघाचीच पकड मजबूत आहे असे खात्रीने म्हणता येईल, आता  माझी ही भविष्यवाणी खरी होणार की माझे दात माझ्याच घशात जातील याचेही उत्तर उद्या मिळेलच, पण आज तरी आपण भारतीय संघाच्या विजयाचे हवेहवेसे स्वप्न बघू शकतो ना?उद्या पावसाने मात्र अशीच कृपा करावी आणि उद्याच्या दिवशी सुट्टी घ्यावी हे माझे देवाकडे असलेले मागणे तुमचेही असेल,नाही का?

धावफलक

भारत

पहिला डाव सर्वबाद 327 आणि 174

आफ्रिका पहिला डाव 197

दुसरा डाव चार बाद 94

एलगर नाबाद 52

बुमराह 2 विकेट्स

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.