Pimpari Chichwad : पिंपरी चिंचवडच्या ‘त्या’ बहुचर्चित लाच प्रकरणात स्थायी समितीच्या आणखी काही नगरसेवकांची चौकशी सुरू

एमपीसी न्यूज : लाचलुचपत विभागाने काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कारवाई करून स्थायी समितीच्या अध्यक्षा सह पाच जणांना दोन लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक केली होती. याच प्रकरणात आता लाचलुचपत विभागाने स्थायी समितीच्या आणखी काही नगरसेवकांची चौकशी सुरू केली आहे. मागील चार दिवसांपासून ही चौकशी सुरू असल्याचे समजते. यामुळे पिंपरी-चिंचवडचा राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

लाचलुचपत विभागाने काही दिवसांपूर्वी महापालिकेतच सापळा रचला होता आणि स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांच्यासह पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, क्लार्क अरविंद कांबळे, राजेंद्र शिंदे व आणखी एकाला अटक केली होती. पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर दडली असल्याचा संशय लाचलुचपत विभागाला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या आणखी काही नगरसेवकांची चौकशी सुरू असल्याचे समोर आले.

दरम्यान पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अशाप्रकारे सापळा रचून ही कारवाई झाल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. वर्क ऑर्डर काढण्यासाठी नऊ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली होती. मागील काही दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडून सखोल चौकशी सुरू आहे. स्थायी समितीवर सदस्य असलेल्या काही नगरसेवकांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. त्यांची जबाब नोंदवले जात असल्याची माहिती लाचलुचपत विभागातील सूत्रांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.